Saturday, August 2, 2025

Mumbai Dadar Kabutar khana : कबुतरखाना हटवण्यासाठी मध्यरात्री पालिकेचं पथक दाखल… पण संतप्त जमावानं कारवाईला घातला आडवा! मध्यरात्री दादरमध्ये काय घडलं?

Mumbai Dadar Kabutar khana : कबुतरखाना हटवण्यासाठी मध्यरात्री पालिकेचं पथक दाखल… पण संतप्त जमावानं कारवाईला घातला आडवा! मध्यरात्री दादरमध्ये काय घडलं?

मुंबई : दादरमधील गाजलेला कबुतरखाना अखेर हटवण्याच्या तयारीला सुरुवात झाली, पण ही कारवाई नक्की कधी होणार, याचं उत्तर अद्याप अनुत्तरितच आहे! मुंबई महापालिकेचं पथक शुक्रवारी मध्यरात्री कबुतरखाना हटवण्यासाठी आलं, पण स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत पालिकेच्या कारवाईला आडवा घातला. परिस्थिती तणावपूर्ण बनली आणि पोलिसांना मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करावा लागला. पालिकेनं कारवाई केली की थांबली, यावर संभ्रमच आहे. मात्र, कबुतरखान्यातील पत्रे, जाळ्या आणि अन्नपाण्याची व्यवस्था हटवण्यात आली आहे. सध्या त्या ठिकाणी केवळ एकच कबुतरांचा पिंजरा उरलेला आहे. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिका या सगळ्या गोष्टी हटवून कबुतरखान्यावर कधी तोडक कारवाई करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.



काही नागरिकांचा कारवाईला विरोध


हा कबुतरखाना केवळ दादरची ओळख नव्हता, तर आजारांचा अड्डा बनला होता. श्वसनाचे आजार, सर्दी-खोकला, दम्याचे झटके, हे सर्व या परिसरात कबुतरांच्या विष्ठा व पिसांमुळे वाढले. नागरिकांच्या गॅलऱ्या, खिडक्या कबुतरांनी व्यापलेल्या. त्यातच रस्त्याच्या मध्यभागी असलेला हा कबुतरखाना वाहतुकीस अडथळा ठरत होता. त्यामुळे हा कबुतरखाना हटवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात होती. परंतु, काल पालिकेचे पथक याठिकाणी कारवाईला आल्यानंतर स्थानिक नागरिकांपैकी काहींनी या कारवाईला विरोध केला असल्याचं पाहायला मिळालं.



दादरच्या मध्यभागी स्फोटक प्रश्नचिन्ह


हा कबुतरखाना १९३३ मध्ये कारंजा म्हणून उभारण्यात आलेली ‘ग्रेड २ हेरिटेज’ वास्तू आहे. पण इतिहासापेक्षा आज आरोग्य अधिक महत्त्वाचं आहे. कबुतरांना दाणे घालणाऱ्या नागरिकांच्या श्रद्धेपेक्षा, आज शेकडो लोकांच्या फुफ्फुसांना होणारी हानी आणि वाहतुकीच्या अडचणी यांच्यावर गांभीर्याने विचार करायची वेळ आली आहे. कबुतरांच्या विष्ठा आणि पिसांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्या होत्या. त्यामुळे मनसेने या कबुतरखान्याच्या विरोधात आवाज उठवला होता. हा कबुतरखाना प्रभादेवीतील कीर्ती महाविद्यालय भाग किंवा वरळीतील मोकळ्या जागेत हलविण्याचा विचार महापालिका करत आहे.

Comments
Add Comment