पुणे : पुण्यातील खराडी परिसरातल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणात शरद पवार समर्थक रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर याला अटक झाली. कोर्टाने प्रांजलची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. यानंतर रोहिणी खडसे यांनी शरद पवारांची भेट घेतली. ही भेट पक्ष संघटनेतील कामाबाबत होती, असे रोहिणी खडसे यांनी सांगितले. अधिवेशन काळात शरद पवारांसोबत काही मुद्यांवर चर्चा राहून गेली होी. याच कारणामुळे संघटनेशी संबंधित कामांसाठी मार्गदर्शन घेण्याकरिता शरद पवारांना भेटल्याचे रोहिणी खडसे म्हणाल्या.
प्रांजल खेवलकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे आणि अद्याप त्याने जामिनासाठी अर्ज केलेला नाही. ही संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया आहे. यावर न्यायालयाबाहेर बोलणे योग्य होणार नाही; असे सांगत रोहिणी खडसेंनी प्रांजलबाबतच्या मुद्यावर प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले. योग्य वेळी योग्य ठिकाणीच या विषयावर बोलेन, असे रोहिणी खडसे म्हणाल्या.
पुणे पोलीस आयुक्तालयात रोहिणी खडसे आणि प्रांजल यांची भेट झाली. रोहिणी यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशीही चर्चा केली. यानंतर रोहिणी खडसेंनी शरद पवारांशीही वेळ मागून घेऊन चर्चा केली. यामुळे प्रांजल प्रकरणात पुढे काय होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.