
नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र शासनातर्फे नागपुरातील सुरेश बाभट सभागृहात तिचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी दिव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ३ कोटी रुपयांच्या बक्षीसाचे धनादेश देऊन गौरवण्यात आले.
नागपूरकर असलेल्या दिव्याने ग्रॅन्डमास्टर होण्याचा मान पटकावत महाराष्ट्राची मान उंचावली आहे. तिच्या याच यशाची दखल घेऊन तिचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसोबत क्रीडामंत्री मानिकराव कोकाटे, ॲड. आशिष जयस्वाल, महाराष्ट्र बुद्धीबळ संघटनेचे अध्यक्ष परिणय फुके, तसेच अनेक आमदार व मोठे अधिकारी उपस्थित होते.
शासनाने खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर रोख बक्षीस देणे सुरू केले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन आणि क्रीडा क्षेत्रावर काही मिनिटे भाष्य केले. ते म्हणाले, "महाराष्ट्र शासन क्रीडा क्षेत्राला महत्व देत असल्याने देश पातळीवरील स्पर्धेत महाराष्ट्राचा क्रमांक आता वरचाच राहतो. शासनाकडून आता खेळाडूंना चांगले फिजिओथेरपीस्ट, न्यूट्रेशियनिस्ट, देशी- विदेशी प्रशिक्षकांसह इतरही सोय देण्याचे प्रयत्न आहे. पूर्वी आंतराष्ट्रीय स्पर्धेत खेळायला जाणाऱ्या खेळाडूंसोबत प्रशिक्षकालाही जायची परवानगी नव्हती. तेथे खेळाडू महत्वाचा असतोच. परंतु त्याच्यासोबत प्रसिक्षकासह इतरही सोयी महत्वाच्या असतात. इतर देशातील खेळाडूकडे या सगळ्या सोयी राहत असल्याने आपल्या खेळाडूला अडचणी यायच्या. त्यामुळे शासनाने सर्व नियम बदलले. सोबत शासनाने खेळाडूंना आता मोठ्या प्रमाणावर रोख बक्षीसही देणे सुरू केले.'
होतकरू खेळाडू आता पैशाच्या कमीमुळे खेळापासून वंचित राहणार नाही
प्रत्यक्षात खेळाडूला विविध ठिकाणी स्पर्धेत सहभागी व्हायला गेल्यावर पैसा लागतो. कुटुंबाचीही मुलांवर खर्चाची मर्यादा असते. त्यामुळे पैसे नसलेल्या खेळाडूपुढे अडचणी यायच्या. काही स्पर्धेलाही मुकायचे. शासनाने ही अडचण दूर करण्यासाठी रोख स्वरूपातील बक्षीस वाढवले. त्यामुळे होतकरू खेळाडू आता पैशाच्या कमीमुळे खेळापासून वंचित राहणार नाही. दरम्यान दिव्या देशमुखला मागच्या स्पर्धेतील विजेतेपनानंतर शासनाने १ कोटी रुपयांचे बक्षिस दिले होते. आता ३ कोटी रुपयांचा धनादेश दिला आहे. हा धनादेश नकली दिसत असल्याने आता तो वठणार काय?, हे पैसे केव्हा मिळणार? हा प्रस्न अनेकांच्या मनात उपस्थित राहिल. परंतु प्रत्यक्षात उधारी नाही तर दिव्याच्या खात्यात शासनाने एक दिवसापूर्वी शुक्रवारीच आर. टी. जी. एस.च्या माध्यमातून ३ कोटी रुपये वळवले असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान दिव्या देशमुखनेही सत्काराबाबत महाराष्ट्र शासनासह नागपूरकरांचे आभार मानले.