अमरावती: अमरावतीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, ती म्हणजे इथे एका महिला पोलिसाची तिच्या घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. अशा घुले असं मृत महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
शहरातील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुकृपा कॉलनीत ३८ वर्षीय महिला पोलीस कर्मचारी आशा घुले यांची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. आशा घुले या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होत्या. तर त्यांचे पती एसआरपीएफमध्ये कर्मचारी आहेत. या हत्येचा तपास सुरू असून डीसीपी गणेश शिंदे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून संशयितांवर नजर ठेवली जात आहे. ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. कारण जिथे एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची तिच्याच घरी गळा दाबून हत्या केली जाते, तर तेथील सामान्य लोकं किती सुरक्षित आहेत? असा प्रश्न विचारला जात आहे.