बोटावर निभावलं!

  53

‘जीवावर बेतलेलं अखेर बोटावर निभावलं' म्हणून राज्याचे नूतन क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी गुरुवारी रात्री सुटकेचा नि:श्वास टाकला असेल. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात बसले असताना कोकाटे यांनी आपल्या मोबाइलवर पत्त्यांचा डाव उघडला आणि करमणूक म्हणून 'वाईच' दोन-चार खेळ्या केल्या. त्या नेमक्या प्रेक्षक गॅलरीतून फोनच्या कॅमेऱ्याने कोणीतरी टिपल्या. त्यावरून बराच गदारोळ झाला. कोकाटेंच्या जागी दुसरा कोणी असता, तर विषय एवढा चिघळला नसता. पण, कोकाटे हे व्यक्तिमत्त्वच कोणी हलक्यात घ्यावं असं नाही. त्यामुळे, सगळ्यांनीच त्यांना गांभीर्याने घेतलं आणि कोकाटे फसत गेले. विषय खोलात जातोय याचं भान कोकाटेंना फार उशिरा आलं. केवळ या प्रकरणातच असं नाही, स्वतःच्याच मिजाशीत वावरायची सवय असलेल्या कोकाटेंबाबत हे नेहमीच होतं. अगदी युवक काँग्रेसच्या दिवसांपासून त्यांच्यासोबत राहिलेले राजकीय नेते आणि कार्यकर्ते हेच सांगतात. हे सरकार आल्यापासून कोकाटे मंत्रिमंडळात आहेत. याचं कारण यावेळच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपला मतदारसंघ त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देऊ केला म्हणून. पवार यांनी या निवडणुकीत पारंपरिक बारामती मतदारसंघाऐवजी ज्या मतदारसंघांचा विचार केला होता, त्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील काही मतदारसंघांबरोबरच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर विधानसभा मतदारसंघाचाही समावेश होता. सिन्नरची हवा जोखण्यासाठी त्यांनी या मतदारसंघात त्यावेळी लागोपाठ दौरेही केले होते. पवार यांच्या त्या मनसुब्याचे कोकाटे यांनी स्वागतच केलं होतं. आपल्या हातातला मतदारसंघ पवार यांच्यासाठी सोडण्याची बिनशर्त तयारी दाखवल्याने साहजिकच कोकाटे यांच्या गुणांत वाढ झाली. त्यातूनच त्यांचा मंत्रिमंडळ प्रवेश नक्की झाला!


जे मनात असेल ते बोलून टाकण्यात कोकाटे मागेपुढे पाहात नाहीत. राजकारणात हा गुण बहुधा अडचणीचाच ठरतो. त्यामुळे, मंत्रिमंडळात आल्यानंतरही कोकाटे यांनी आपल्या पूर्वीच्याच लौकिकात अधिक भर टाकण्यास सुरुवात केल्यानंतर ते चांगलेच अडचणीत आले. त्यासाठी त्यांना पक्षप्रमुखांकडून खडे बोलही ऐकावे लागले. मुख्यमंत्र्यांनी उघड नाराजी व्यक्त करून झाली. पण म्हणतात ना, 'मारणाऱ्याचा हात धरता येतो, बोलणाऱ्याचं तोंड कसं धरणार?' अगदी तशीच गत कोकाटे यांच्याबाबतही झाली. 'शेतकरी भिकारी नाही. मला तसं म्हणायचं नव्हतं. माझ्या विधानाचा विपर्यास झाला' असा खुलासा करताना कोकाटे यांनी 'शेतकरी कसला भिकारी? सरकार भिकारी' असा खुलासा करून स्वतःलाच आगीतून फुफाट्यात नेऊन टाकलं'! त्याचा धुरळा खाली बसत नाही तोवर हे पत्त्यांचं प्रकरण समोर आलं. त्यातही खुलासा करताना 'बुडत्याचा पाय खोलात' अशीच गत झाली. 'मोबाइल सुरू करताना रमीचा डाव 'पॉप-अप्' झाला' या त्यांच्या खुलाशानंतर विधिमंडळाने केलेल्या तपासात त्यांच्या मोबाइलवर रमीचा डाव किती वेळ चालला होता इथपासून त्यांच्या या क्रीडानंदाचे चित्रीकरण कुठून केलं गेलं? इथपर्यंत सगळ्याच बाबी उघड झाल्या. यावेळीही केवळ तेच अडचणीत आले नाहीत. त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रवक्ते, पवार - असे सगळेच अडचणीत आले. त्या सगळ्यांनीच अगदी कठोर प्रतिक्रिया दिल्या. त्यावरून 'कोकाटे यांची गच्छंती नक्की' अशा प्रकारच्या बातम्याही काही अतिउत्साही माध्यमांनी चालवल्या. पण, तसं घडणं अवघड होतं. कारण, त्याचवेळी अन्यही काही मंत्र्यांच्या तशाच वादग्रस्त बाबी सुरू होत्या. त्यांच्यावर शिस्तभंगाची किंवा औचित्यभंगाची कारवाई होण्याची चिन्ह नव्हती. जर त्यांच्यावर कारवाई नाही, तर एकट्या कोकाटेंवरच कारवाई कशी होणार? राजकारणातली गणितं आणि समीकरणं अशीच वेगळी असतात. त्यामुळे, कोकाटे वाचले. केवळ खाते बदलावर, शिक्षा म्हणून कमी महत्त्वाचं खातं स्वीकारून कोकाटेंनी स्वतःची मान सोडवून घेतली, असंच चित्र बाहेर आहे.


कोकाटे यांचं विधिमंडळाच्या सभागृहातलं गैरवर्तन केवळ रमी खेळण्याचं आहे, की सभागृहात मोबाइल वापरण्याचं आहे? सदस्यांच्या सभागृहातल्या हालचालींचं अशा प्रकारे चित्रण करणं गंभीर नाही का? या मुद्द्यांचा ऊहापोह अजूनतरी कुठे नीट झालेला दिसत नाही. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह विधिमंडळ प्रशासन आणि सभागृहालाही याचा विचार करावा लागेल. सभागृहाचे संकेत, परंपरांचं उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी खुद्द सभागृहात सुरू असतातच. त्यात सभागृहाच्या शिस्तीचा, सभागृहातील वर्तनाचा मुद्दाही विचारात घ्यावा लागणार आहे. सदस्यांनी; अनेकदा मंत्र्यांनीही एकमेकांना दिलेले 'तोंडात गुळणी धरण्याचे पदार्थ' वाहिन्यांच्या पडद्यावर दिसत असतात. सभागृहात असताना सदस्यांनी मोबाइलचा वापर करणं, काहीतरी चघळत राहाणं, प्रेक्षक सज्जातून प्रेक्षकांनी चित्रीकरण करणं, विविध गॅलऱ्यांत सुरू असलेल्या 'फ्री स्टाईल' हालचाली - या सगळ्या बाबी विधिमंडळाचं गांभीर्य घालवणाऱ्या आहेत. फार पूर्वी याबाबत पिठासीन अधिकारीच अत्यंत कडक आणि आग्रही असत. पिठासीन अधिकाऱ्यांच्या या पावित्र्यामुळे विधान भवनाची सुरक्षा यंत्रणाही अत्यंत सजग असे. प्रेक्षक सज्जातील एखादा प्रेक्षक खुर्चीत पायावर पाय टाकून बसला, वार्ताहर गॅलरीतला एखादा वार्ताहर सभागृहात बोलणारा सदस्य कोण आहे, हे पाहण्यासाठी आपल्या बाकावरून वाकला, तरी सुरक्षा रक्षकाकडून त्याला जागीच ताकद दिली जात असे. गॅलरी प्रवेशिका असूनही संकेतभंग करणाऱ्यांना सुरक्षा रक्षकांनी अनेकदा गॅलऱ्यांतून बाहेर काढलेलं आहे! विधिमंडळाची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी अशा प्रकारचा आग्रह असायला हवा. तशी शिस्त लावायला हवी. ती असेल, तर कोणाचीच विधिमंडळात बसून कोणतंही आक्षेपार्ह वर्तन करण्याची हिंमत होणार नाही.

Comments
Add Comment

अजेंडा फसला!

‘दहशतवादाला कुठलाही धर्म नाही, कुठलाही रंग नाही', अशी टिप्पणी करत मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी राष्ट्रीय तपास

‘लाडक्यां’चा घोटाळा

राज्यात लोकप्रिय आणि गेमचेंजर ठरलेली ‘लाडकी बहीण योजना’ सध्या एनकेन कारणाने वादात आहे. ही सरकारी योजना केवळ

माँ तुझे सलाम...

पहलगाम या काश्मिरातील निसर्गरम्य स्थळी भारतातील पर्यटक फिरायला गेले असताना कसलाही अपराध नसताना त्यांचे शिरकाण

‘दिव्या’ विजेती

भारतात उदारीकरणाचे पर्व सुरू झाल्यानंतर सारे चित्र पालटले आणि महिलांची सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या

शाळांच्या इमारतींचा धोका

बालकांना कळत्या वयापासूनच शालेय जीवनाशी समरस व्हावे लागते. एकेकाळी उजवा हात डाव्या कानाला लागल्याशिवाय

मोदीयुग

हिंदू पुराणांत चार युगांची कल्पना सांगितली आहे. चार युगांच्या चक्राकार गतीने विश्व बांधलेलं आहे, असं त्यात