सेवाग्रामला झालेल्या या एकदिवसीय मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनाच मार्गदर्शन केले. त्यावेळी तुम्ही पक्षाला खड्ड्यात घालू बघाल तर पक्ष तुम्हाला खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड दम देखील भरला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या आपल्याला महायुतीतच लढवायच्या आहेत हे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचबरोबर जर स्थानिक स्तरावर काही ठिकाणी युती होऊ शकली नाही, तर होणाऱ्या मैत्रीपूर्ण लढतीत मित्रपक्षांवर टीका करणे टाळा हे देखील त्यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट केले. भाजप हा सर्वात मोठा पक्ष राहील हे देखील त्यांनी सांगून मित्र पक्षांना टोला देखील लगावला.
राज्यात भाजपची सत्ता आल्यावर विदर्भाचा कसा विकास घडवून आणला, याची साद्यंत माहिती देत अजूनही विकासाच्या काय काय योजना आहेत हे फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना समजावून सांगितले. त्याचबरोबर या सर्व योजना तुम्ही जनसामान्यांपर्यंत पोहोचवा आणि विदर्भ आता मागास राहणार नाही हे लोकांना समजावून सांगा असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सुचित केले. गतकाही वर्षात सिंचनासाठी युती सरकारने कुठे कुठे आणि किती पैसा आणला आहे याची माहिती देत भविष्यात आता विदर्भ दुष्काळी भाग राहणार नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केले. एकूणच सेवाग्राममध्ये जाऊन फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे विदर्भात रणशिंग फुंकले असे म्हणता येईल.
ग्रँडमास्टर दिव्या देशमुख नागपुरात दाखल
सोमवारी संध्याकाळी नागपूरच्या दिव्या देशमुखने जॉर्जियामध्ये सुरू असलेल्या महिला विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवल्याची बातमी आली आणि नागपुरात आनंदाची लाट पसरली. विदर्भ कन्या असलेली दिव्या ही नागपूरच्या शंकर नगर परिसरात निवासाला असलेल्या डॉ. जितेंद्र देशमुख आणि डॉ. नम्रता देशमुख या दाम्पत्याची मुलगी आहे, तर राज्य लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. जी. देशमुख यांची नात आहे. दिव्या ग्रँडमास्टर बनल्याची बातमी येताच तिच्या चाहत्यांनी शंकर नगर येथील तिच्या निवासस्थानी एकच गर्दी केली. तिचे वडील डॉ. जितेंद्र आणि आजीचे सर्वांनी अभिनंदन केले. बुधवारी रात्री दिव्याचे जॉर्जियाहून नागपूरला आगमन झाले. त्यावेळी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर नागपूरकरांतर्फे तिचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी नागपूरचे माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी तिचे पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी नागपूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे गिरीश व्यास, महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष आमदार परिणय फुके, माजी राज्यसभा सदस्य अजय संचेती, बुद्धिबळ पटू सच्चिदानंद सोमण यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येत उपस्थित होते. विमानतळावर दिव्याचे भव्य स्वागत केल्यावर ढोल-ताशांच्या गजरात उघड्या जीपवर उभे करून तिची विमानतळ ते शंकर नगरातील देशमुखांचे निवासस्थान अशी भव्य मिरवणूकही काढण्यात आली. यावेळी ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या कडकडाटाने परिसर दुमदुमून गेला होता.
दिव्याचा नागपूरकरांतर्फे शनिवारी स्थानिक सुरेश भट सभागृहात भव्य सत्कार करण्यात येणार असून या समारंभाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रवृत्ती मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आता लवकरच होणार हे निश्चित झाले. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आपापली रणनीती ठरवून कामाला लागलेले दिसतात. भारतीय जनता पक्षाने विदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी गेल्या सोमवारी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे चरखा सभागृहात विदर्भस्तरीय पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महसूल मंत्री चंद्रकांत चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, अशोक उईके, पंकज भोयर, तसेच आकाश फुंडकर हे इतर वैदर्भीय मंत्री, आमदार, खासदार आणि पदाधिकारी या मेळाव्यात सहभागी झाले होते. विदर्भात ११ जिल्हा परिषदा, तर चार महानगरपालिका आहेत. याशिवाय नगर परिषदा, पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. सर्वच ठिकाणी भाजपसह महायुतीला विदर्भात आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. त्याची सुरुवात जरी या मेळाव्याने झाली असली तरी गेल्या आठवड्यातच भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक इथे भाजपने मित्रपक्षांना सोबत घेत आपली सत्ता प्रस्थापित करून आपले खाते उघडले आहेच.
- अविनाश पाठक