
अष्टविनायक तीर्थक्षेत्राला शुद्ध पाणीपुरवठा योजनेची प्रतीक्षा
अशी आहे जाहीर सूचना
दिनांक ६/२/१९९० सालचे हे जाहीर सूचना पत्रक आहे.
गौसखान पठाण
सुधागड-पाली : पाली शहरातील अष्टविनायक तीर्थक्षेत्राला पाणीपुरवठा योजनेची प्रतीक्षा आहे. पाली शहरात तब्बल ३५ वर्षांनतर अजूनही परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. कारण पाणी फिल्टर होऊन येत नसल्याने नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे अशा आशयचे तत्कालीन ग्रामपंचायतचे जाहीर सूचना पत्रक सध्या सर्वत्र फिरत आहे. हे जाहीर पत्र १९९०चे आहे. सूचना पत्रकाचा फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे.
याचा अर्थ आजपर्यंत पालीकरांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे तब्बल २५ कोटींची शुद्ध पाणीपुरवठा योजना आजही लाल फितीत अडकल्याचे बोलले जात आहे. पालीतील नागरिक तुषार ठोंबरे यांना त्यांची जुनी कागदपत्रे तपासताना त्यामध्ये हे पत्रक आढळले. या जाहीर सूचनेचे पत्रक पाहून नागरिक आपल्या भावना उपहासात्मकपणे व्यक्त करताना दिसत आहेत. अनेक नागरिक संताप देखील व्यक्त करत आहेत.
अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली शहराला थेट अंबा नदीतून कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता पाणीपुरवठा केला जातो. इतरही गावातील लोक अंबा नदीचे पाणी वापरतात. मात्र नदीत सोडण्यात येणारे सांडपाणी, कंपन्यांमधील प्रदूषित पाणी, घाण व कचरा, वाळू उपसा यामुळे येथील नागरिक व जीवसृष्टीचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे दुषित पाणी पिण्यायोग्य नसल्याने येथील ग्रामस्थांच्या प्रकृतीवर प्रतिकुल परिणाम होत आहे.
महाराष्ट्र शासनाने केलेल्या २००८-०९ च्या सर्व्हेनुसार पालीची लोकसंख्या व पालीत दररोज येणार्या भाविक व पर्यटकांच्या संख्येनुसार शुद्ध नळ पाणीपुरवठा योजनेचे नियोजन केले होते.
एकूण ७ कोटी ७९ लाखाचा निधी व १० टक्के लोकवर्गणीद्वारा नळयोजना उभी राहणार होती; परंतु राजकीय श्रेयवादामध्ये ही योजना रखडली. शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेसाठी आत्ता जवळपास २५ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आहे.
२०२२ रोजी पाली नगरपंचायतची स्थापना झाल्यानंतर नगरपंचायततर्फे या योजनेचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
पालीकरांना येथील अंबा नदीचे पाणी नळाद्वारे पुरविण्यात येते. या पाण्यावर कोणतेही शुद्धीकरण व क्लोरीनेशनची प्रक्रिया न करता थेट पालीकरांना हे पाणी पुरविले जाते. आत्तापर्यंत येथील नळांतून चक्क जिवंत साप, खुबे, शिंपले, मासे आणि किडे अनेकवेळा बाहेर आलेत. गाळ, चिखल, शेवाळ येणे हे तर नेहमीचेच आहे.
शुद्ध पाणीपुरवठा योजनेची फाईल मंजुरीसाठी नगर विकास विभाग ३३ (न. वि. ३३) येथे सध्या आहे. तिथे अव्वर सचिव यांची मान्यता मिळाल्यावर एक बैठक होईल आणि त्यानंतर पुढे मंजुरीची प्रक्रिया होईल. महाराष्ट्रातील अनेक शुद्ध पाणीपुरवठा योजना मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. पाली शुद्ध पाणीपुरवठा योजना मंजुरी व इतर विकास कामासंदर्भात काही दिवसांपूर्वी स्वतः मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. शुद्ध पाणी योजना कार्यान्वित होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
- अरिफ मणियार, प्रभारी नगराध्यक्ष, पाली नगरपंचायत