
मुंबई : स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. प्राजक्ता गायकवाडने अनेक मराठी चित्रपट तसेच मालिकांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकताच प्राजक्ताने सोशल मीडियावर एक खास पोस्ट करत चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या घरी लवकरच लग्नाचा बार उडणार असल्याचे दिसत आहे. तिने सोशल मीडियावर चार फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये प्राजक्ता हात जोडून उभी आहे. तिनं पारंपरिक साज केला आहे. तर, तिच्या कपाळावर हळदीकुंकू लावलेलं आहे. तर, तिच्या अवतीभवती खूप नातेवाईत आहेत. याशिवाय प्राजक्ताच्या गळ्यात मोठा हार घातला आहे. प्राजक्ताच्या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधलं आहेच, पण त्याहीपेक्षा तिनं हे फोटो शेअर करताना दिलेलं कॅप्शन पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा, ठरलं ! असा खास कॅप्शन देत प्राजक्ताने तिचे लग्न ठरल्याचे सांगितले आहे. त्यामुळे प्राजक्ताचा साखरपुडा झाला असून त्याच सोहळ्यातील हे फोटो आहेत अशी चर्चा आता रंगली आहे.
प्राजक्ता गायकवाडचा होणारा नवरा कोण हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. तीने याविषयी अद्याप खुलासा केला नाहीये. त्यामुळे प्राजक्ताचा होणारा नवरा कोण याची उत्सुकता शिगेला आहे. प्राजक्ताने लग्नाचा खुलासा केल्याने ती होणाऱ्या नवऱ्याबद्दलही लवकरच सांगेल, अशी शक्यता आहे.
प्राजक्ताने लग्न ठरल्याचं जाहीर करताच नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर, मेघा धाडे, कार्तिकी गायकवाड, सावनी रविंद्र अशा अनेक सेलिब्रिटींनी प्राजक्ताला कमेंट्स करत तिच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या आहेत.
प्राजक्ता गायकवाडने स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून मराठी मालिका क्षेत्रात एन्ट्री केली. या मालिकेतील तिची येसूबाईंची भूमिका प्रचंड गाजली. अमोल कोल्हे यांच्यासोबत तिने साकारलेल्या या भूमिकेला लोकांनी अशरक्ष: डोक्यावर घेतले. यानंतर तिने अनेक मराठी मालिका तसेच चित्रपटांमध्येही काम केले. प्राजक्ताच्या नवीन प्रोजेक्टबद्दल अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही.