
रत्नागिरी : चिपळूण शहरातील गांधारेश्वर पुलावरून दोन दिवसांपूर्वी नदीत उडी मारून आत्महत्या केलेल्या नवविवाहित दाम्पत्यापैकी पत्नी अश्विनी अहिरे यांचा मृतदेह आढळून आला. मात्र पती नीलेश अहिरे याचा शोध अद्याप सुरू आहे.
मूळचे धुळे जिल्ह्यातील साक्री येथील रहिवासी असलेले नीलेश अहिरे शिक्षणासाठी चिपळूणमध्ये आले होते. डीबीजे महाविद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मोबाइल दुरुस्तीचे प्रशिक्षण घेतले आणि बसस्थानकाजवळ स्वतःची मोबाइल शॉपी सुरू केली. मृदू स्वभाव, सचोटी आणि मेहनतीमुळे त्यांनी व्यवसायात चांगली प्रगती केली होती. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत त्यांनी नातेवाइकांच्या घरातून बाहेर पडून तीन-चार वर्षे स्वतंत्रपणे भाड्याच्या खोलीत वास्तव्य केले.

मुंबई : मुंबईपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या वसईत, स्थानिकांनी एका अनोख्या आणि सर्जनशील पद्धतीने निषेध केला आहे. बेनापट्टी हिंदू ...
गेल्या ८ मे २०२५ रोजी नीलेशचा अश्विनीसोबत विवाह झाला. विवाहानंतर दोघेही नव्या आयुष्याची सुरुवात करत होते. पर्यटनस्थळांना भेटी, कुटुंबीयांचे भेटीगाठी अशा आनंदाच्या क्षणांनी त्यांच्या संसाराला सुरुवात झाली होती. काही दिवसांपूर्वी अश्विनीचा वाढदिवसही साजरा करण्यात आला होता. तिच्या आई आणि मामाही काही दिवस त्यांच्या घरी मुक्कामी होते. सर्व काही सुरळित सुरू असतानाच बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास या दोघांनी गांधारेश्वर पुलावरून वाशिष्ठी नदीत उडी घेत आत्महत्या केली.
बुधवारी सकाळी ते दोघेही मोटरसायकल घेऊन चिपळूणमधील गांधारेश्वर पुलावर आले. त्याठिकाणी दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर पुन्हा ते दोघे मोटरसायकल घेऊन पुढे निघून गेले. काही वेळाने ते पुन्हा पुलावर आले. अश्विनी आणि नीलेशने एकाच वेळी पुलावरून नदीपात्रात उडी मारल्याची माहिती समोर येत आहे. या दोघांनी असे टोकाचे पाऊल का उचलले, याचं नेमकं कारण स्पष्ट झालेले नाही.
या घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलीस, एनडीआरएफ पथक, स्थानिक प्रशासन आणि नातेवाईकांनी शोधमोहीम सुरू केली. अश्विनी अहिरे यांचा मृतदेह आढळून आला असून नीलेश यांचा शोध अद्याप सुरू आहे. दाभोळ खाडी परिसरातील गावांमध्ये सतर्कतेसाठी सूचना देण्यात आल्या असून बोटीच्या सहाय्याने शोधमोहीम सुरू आहे.
या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नातेवाईक, परिचित आणि नागरिकांत या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे.