
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी उपराष्ट्रपती या पदासाठी ९ सप्टेंबर रोजी मतदान होणार असल्याचे सांगितले. याआधी ९ ऑगस्टच्या शनिवारपासून उपराष्ट्रपती या पदासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची मुदत २१ ऑगस्ट रोजी संपणार आहे.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना गुरुवार ७ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध होणार आहे. उपराष्ट्रपती या पदासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दिवस हा गुरुवार २१ ऑगस्ट २०२५ हा असेल. उमेदवारी अर्जांची छाननी शुक्रवार २२ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस हा सोमवार २५ ऑगस्ट २०२५ हा असेल. आवश्यकता असल्यास मतदान मंगळवार ९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत होणार आहे. मतमोजणी आवश्यकता असल्यास मंगळवार ९ सप्टेंबर २०२५ रोजी मतदान पूर्ण झाल्यानंतर होणार आहे.

उपराष्ट्रपती या पदासाठी आवश्यक पात्रता
उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक
उमेदवाराचे वय किमान ३५ वर्षे असावे
उमेदवार राज्यसभा सदस्य होण्यास पात्र असावा
उमेदवाराने कोणत्याही राज्य किंवा केंद्र सरकारच्या अंतर्गत कोणतेही लाभाचे पद (जसे की सरकारी नोकरी) धारण करू नये.
उपराष्ट्रपती या पदासाठी कशी होते निवडणूक ?
संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करतात. मतदान करणाऱ्यांमध्ये राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेल्या सदस्यांचाही समावेश असतो. गुप्त पद्धतीने मतदान होते. खासदार उमेदवारांना त्यांच्या प्राधान्यानुसार रँकिंग देतात. प्रथम पहिल्या पसंतीची मते मोजतात यातून विजयी उमेदवार निश्चित झाला नाही तर दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातात. दुसऱ्या पसंतीची मते मोजूनही विजयी उमेदवार निश्चित झाला नाही तर तिसऱ्या पसंतीची मते मोजली जातात. ही प्रक्रिया विजयी उमेदवाराची घोषणा होईपर्यंत सुरू राहते. निवडणूक निकालाविषयी वाद झाल्यास निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येते. आयोगाने दिलेला निर्णय अमान्य असल्यास सर्वोच्च न्यायालय हा शेवटचा पर्याय उपलब्ध आहे.