
कोल्हापुर : नांदणी, ता. शिरोळ येथील जैन मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या वनतारा प्राणी संग्रहालय गुजरात येथे नेण्यात आले. यामुळे स्थानिक ग्रामस्थ, जैन समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यामुळे गुजरात येथील वनतारा जामनगर येथील टीम नांदणी मठासोबत चर्चा करण्यासाठी आली होती. वनताराचे सीईओ विहान करनी, पेटा संस्थेचे अधिकारी, नांदणी मठाचे मठाधिपती, जिनसेन महाराज यांच्यात चर्चा झाली आणि हत्तीण परत देण्याबाबत वनताराचे सीईओ विहान करनी यांनी सकारात्मकता दर्शवली.
माधुरी हत्तीणीला नेण्यास विरोध झाला होता. मोबाईल फोनचे जिओ सिमकार्ड बंद करून बहिष्कार टाकला. अंबानींच्या सर्व उत्पादनांवरही बहिष्काराचा नारा देण्यात आला. यामुळे वनतारा संग्रहालय व्यवस्थापनाने दखल घेतली. वनतारा, पेटाचे अधिकारी विमानाने कोल्हापुरात आले. त्यांनी नांदणी मठात जाऊन चर्चा करण्याची तयारी दर्शवली. यामुळे नांदणीमध्ये हजारो बांधव मोठ्या संख्येने एकत्र येत आले. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने दक्षता घेतली. लोकभावना लक्षात घेऊन पोलिसांनी वनताराच्या टीमला विमानतळावर थांबवले होते. जीनसेन भट्टारक स्वामींशी चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.

पहिल्याच दिवशी माधुरी हत्तीण जखमी? नेटकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया जामनगर: नांदणीच्या महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीचे वनतारामध्ये दिमाखात आगमन झाले ...
यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलिस प्रमुख योगेशकुमार गुप्ता, यांच्यासह मठाधिपती जिनसेन महाराज आणि वनतारा टीम, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने उपस्थित होते. पण मठाधिपती, जिनसेन महाराज आणि वनतारा सीईओ विव्हान यांच्यात बंद खोलीत चर्चा झाली. मठाधिपती जीनसेन स्वामी जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या महत्त्वाच्या बैठकीतून अचानक बाहेर पडले. बैठकीत नांदणी मठासह कोल्हापूर जिल्ह्याची शान असलेल्या स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला पुन्हा मठाकडे देण्याचा निर्णय होणार होता. परंतु, बैठकीत ठोस निर्णय झाला नसल्याने भट्टारक यांनी निघून जाणे पसंत केले. यामुळे उपस्थितांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. ते नक्की का बाहेर पडले, याचे कारण स्पष्ट झाले नाही.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, स्वामीजींनी स्पष्ट शब्दांत बोलण्यास नकार दिला.
यानंतर खासदार धैर्यशील माने यांनी माध्यमाशी बोलताना वनतारा व्यवस्थापन 'माधुरी हत्तीणीला परत देण्याबाबत सकारात्मक आहे. पण त्यासाठी न्यायालयीन बाबींची पुर्तता करावी लागेल. यासाठी केंद्र व राज्य शासनाचे सहकार्य घेतले जाईल असे सांगितले. तर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी माधुरीला परत देण्यासाठी वनतारा व्यवस्थापनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन सीईओ विव्हान यांनी दिले असल्याचे सांगितले.