Friday, August 1, 2025

स्ट्रॉबेरी पिकाचा पीक विमा योजनेत समावेश

स्ट्रॉबेरी पिकाचा पीक विमा योजनेत समावेश

कळवण : कळवण तालुक्यातील पश्चिम पट्टा आणि सुरगाणा तालुक्यातील घाटमाथा तसेच गुजरात सीमेलगतच्या सापुतारा परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. आमदार नितीन पवार यांच्या पाठपुराव्यामुळे स्ट्रॉबेरी पिकाचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समावेश करण्यात आला आहे. यामुळे अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्याला आर्थिक संरक्षण मिळणार आहे.


कळवण आणि सुरगाणा भागातील थंड हवामान तसेच पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन स्ट्रॉबेरी लागवडीसाठी अत्यंत पोषक आहे. कमी जागेत जास्त उत्पन्न आणि चार ते पाच महिने सतत फळे देणारे हे नगदी पीक असल्याने आदिवासी शेतकरी मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी लागवडीकडे वळले आहेत. विशेषतः, सुरगाणासारख्या आकांक्षित तालुक्यात जवळपास १६० हेक्टरवर स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते, ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. गुजरात राज्याच्या सीमेजवळ असल्याने पर्यटकही स्ट्रॉबेरी खरेदीसाठी आकर्षित होतात, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते.


मात्र, अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे स्ट्रॉबेरी पिकाचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांचा घास हिरावला जात होता. या पिकाला कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत होते. आमदार नितीन पवारांचा यशस्वी पाठपुरावा या समस्येवर उपाय म्हणून सुरगाणा तालुक्यातील शेतकऱ्यांनी अन्य फळपिकांप्रमाणे स्ट्रॉबेरी पिकास नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी आमदार नितीन पवार यांच्याकडे केली होती. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत आमदार पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे यासंबंधी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले असून, शासनाने आता मृग आणि आंबिया बहारातील डाळिंब, द्राक्ष, आंबा, काजू, केळी या फळपिकांसोबत स्ट्रॉबेरी या फळपिकालाही प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत संरक्षण दिले आहे. याबाबतचा अधिकृत शासन निर्णय लवकरच प्रसिद्ध होणार असून, यामुळे स्ट्रॉबेरी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Comments
Add Comment