
कोकणच्या उत्तर भागात पूर्वेकडे सह्याद्री पर्वतरांगा, पश्चिमेकडे अरबी समुद्रा दरम्यान पसरलेला आहे. पालघर जिल्ह्यात जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड, पालघर, डहाणू व वाडा अशा एकूण आठ तालुक्यांचा समावेश आहे. या जिल्ह्याला मुंबई ही जवळ असून त्याचे अंतर सुमारे ११० किलोमीटर आहे. वसई, पालघर, डहाणू तालुके प्रामुख्याने रेल्वे मार्गाने जोडलेले असून रस्त्यांनीही ते जोडलेले आहेत. वाडा, विक्रमगड, जव्हार हे तालुके पालघर-मनोर-वाडा रस्ता राज्य महामार्गाने जोडलेले आहेत. जिल्हा मुख्यालयापासून २० किलोमीटर अंतरावर मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ हा असून डहाणू व तलासरी तालुक्याची जोडलेला आहे. पालघर जिल्ह्याला सोनेरी इतिहासाचा वारसा असून त्यात प्रामुख्याने पालघर, वसई व जव्हार अशा तीन तालुक्यांना ऐतिहासिक महत्त्वही आहे. वसई तालुक्यात पूर्वी पोर्तुगिजांचे राज्य होते. ही पोर्तुगिजी परंपरा पेशवेकालीन चिमाजी आप्पा यांनी मोडीत काढत पोर्तुगिजांचे साम्राज्य नष्ट करून पावणेतीनशे वर्षे अगोदर या ठिकाणी मराठी झेंडा रोवला. सन १९४२ मध्ये संपूर्ण भारतभर भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये 'चले जाव' आंदोलनात पालघर हा महत्त्वाचा दुवा व केंद्र होते. इंग्रजी हुकूमशहा विरोधात लढा देण्यासाठी पालघर तालुक्यात १४ ऑगस्ट १९४२ रोजी उठाव झाला होता. या चळवळीमध्ये इंग्रजांशी दोन हात करताना पालघर तालुक्यातील पाच तरुण शहीद झाले. संपूर्ण पालघर आजही १४ ऑगस्टला हुतात्मा दिन व शहिदांना श्रद्धांजली अर्पण करतो. या शहिदांची स्मृती सदा स्मरणात राहावी याकरिता पालघर शहरात हुतात्मा स्तंभ उभारण्यात आला. १९३० मध्ये गांधीजींनी सुरू केलेल्या मिठाच्या सत्याग्रहात तालुक्यातील वडराईपासून ते सातपाटीपर्यंतचे अनेक कार्यकर्ते सामील झाले होते. सातपाटी येथे परदेशी वस्तूंची होळी करण्यात आली होती. जिल्ह्यातील जव्हार हे थंड हवेचे ठिकाण असून ते प्रसिद्ध आहे.
मिनी महाबळेश्वर असे या ठिकाणाबाबत संबोधले जाते. राजे राजाराम मुकणे यांचे स्वतंत्र संस्थान म्हणजे जव्हार होय. राजे मुकणे यांनी त्याकाळी बांधलेला मुकणे राजवाडा आजही इतिहासाची साक्ष देत आहे. जिल्ह्यात अनेक राजेकालीन गड-किल्ले असून ते कुठे समुद्रकिनारी तर कुठे डोंगरावर वसलेले आहेत. बहुतांश आदिवासी जमाती या जिल्ह्यांमध्ये आढळून येतात. यामध्ये प्रामुख्याने वारली मल्हार कोळी, कातकरी आदी आदिवासी जमाती आहेत. या आदिवासी समाजाला आपला सांस्कृतिक वारसा असून त्यांनी तो जपलेला आहे. वारली चित्रकला ही चित्रशैली जगभर प्रसिद्ध आहे. आदिम काळापासून ही संस्कृती आदिवासी समाजाला वारसा पद्धतीने लाभलेली आहे. त्याचप्रमाणे आदिवासी तारपा नृत्य कला ही बऱ्याच वर्षांपासून चालत आलेली व प्रसिद्ध असलेली कला लोक जपत आहेत. जिल्ह्यामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय आहे. जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टी व बंदर पट्टी भागात मासेमारी हा येथील मच्छीमार समूहाचा प्रमुख व्यवसाय असून पालघर तालुक्यात सातपाटी, दातिवरे, मुरबे, नवापूर, दांडी, आलेवाडी, नांदगाव ही मासेमारीचा प्रमुख ठिकाणे असून वसई तालुक्यात नायगाव, पाचूबंदर, किल्ला बंदर अर्नाळा, पालघर तालुक्यात सातपाटी, वडराई तसेच डहाणू तालुक्यामध्ये धाकटी डहाणू, बोर्डी, चिंचणी म्हणून ही या ठिकाणची प्रमुख बंदरे आहेत.
सागरी पर्यटनाचे विशेष आकर्षण
जिल्ह्याला पर्यटनाच्या दृष्टीने एक वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. यामध्ये सागरी पर्यटनाचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. केळवे समुद्रकिनारा हा येथील पर्यटकांसाठी विशेष आकर्षण असून मुंबईपासून ते गुजरातपर्यंतचे पर्यटक या ठिकाणी समुद्राची सफर व घरगुती जेवणाची चव चाखण्यासाठी नेहमीच येत असतात. शिरगाव समुद्रकिनाराही पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. डहाणू तालुक्यात असलेला बोर्डी समुद्रकिनारा हा नेहमीच पर्यटकांना खुणावत आलेला आहे. या समुद्रकिनाऱ्यावर बऱ्याच चित्रपटांची शूटिंगही झालेली आहे. डोंगरी भागातील जव्हार हे एक मुख्य पर्यटनाचे ठिकाण आहे. या ठिकाणी दाबोसा धबधबा तर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण नेहमीच राहिलेले आहे. त्याचबरोबरीने राजाराम मुकणे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला राजवाडा पाहण्यासाठीही पर्यटक विशेष गर्दी करीत असतात. सूर्य मावळताना पाहण्यासाठी येथील हनुमान पॉइंट हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.
जिल्ह्याला ऐतिहासिक किल्ले वारसा
वसईचा किल्ला हा नरवीर चिमाजी आप्पा यांनी पोर्तुगिजांकडून काबीज केला होता व त्या ठिकाणी मराठी झेंडा रोवला होता. याच बरोबरीने या समुद्रकिनाऱ्यावर पुढे अर्नाळा किल्ला आहे. याला जलदुर्ग, किल्ले जंजिरा असेही नाव आहे. सन १५१६ मध्ये तो बनविण्यात आल्याचा अंदाज आहे. या किल्ल्यावर मुगल, मराठे, पोर्तुगीज व पेशव्यांनी राज्य केले आहे. केळवे समुद्रकिनारी पाणकोट किल्ला असून हा किल्ला शिवकालीन असल्याचे सांगितले जाते. शिरगावला शिवकालीन शिरगाव किल्ल्याचा वारसा असून हा भव्यदिव्य किल्ला आजही इतिहासाची साक्ष देत आहे. या किल्ल्याला पुरातत्त्व विभागाने विशेष मान्यता दिली आहे. सफाळे पश्चिमेकडील भाग भवानगड किल्ला हा किल्लेप्रेमींना खुणावत असतो. भवानगड किल्ला हा उंच ठिकाणी बांधलेला असून आजही तो काही अंशी सुस्थितीत असल्याचे दिसते. दुर्गप्रेमी या ठिकाणी नेहमीच येऊन या किल्ल्याची राखण करीत आहेत. अशेरीगड हा डहाणू तालुक्यात असून १५५० फूट उंच डोंगरावर वसलेला किल्ला. शत्रूंवर पाळत ठेवण्यासाठी हा किल्ला बांधलेला असल्याचे समजते. या किल्ल्याला शिवकालीन टाक्या व पाण्याचे कुंड आहेत.
पालघर जिल्हा व्हावा ही या भागातील नागरिकांची तीस वर्षांची इच्छा-आकांक्षा पूर्ण झाली ती १ ऑगस्ट २०१४ रोजी. राज्यातील ३६ वा जिल्हा म्हणून पालघर जिल्हा अस्तित्वात आला. पालघर जिल्हा हा सागरी, नागरी, डोंगरी अशा तीन भागांत विभागला गेला. या तिन्ही ठिकाणी पर्यटनाला चांगलाच वाव आहे. त्याचप्रमाणे सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक वारसा सुद्धा या जिल्ह्याला लाभला. जिल्हा निर्मितीला आज अकरा वर्षे पूर्ण झालीत. मुंबईपासून जवळच असलेल्या या जिल्ह्यात अनेक मोठे प्रकल्प आता उभे राहत असल्याने या जिल्ह्याला नवी ओळख देखील मिळू लागली. आज पालघर जिल्ह्याच्या वर्धापन दिनानििमत्त घेतलेला वेध...
- गणेश पाटील