
पहिल्याच दिवशी माधुरी हत्तीण जखमी? नेटकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया
जामनगर: नांदणीच्या महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीचे वनतारामध्ये दिमाखात आगमन झाले खरे, पण तिला मठातून जामनगरला हलवल्याबद्दल आजही लोकांच्या मनात संताप कायम आहे. यंदारम्यानच वनताराने माधुरीच्या स्वागताचे सोशल मिडीयावर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते, ते आता व्हायरल होत आहेत. त्यामधील एका व्हिडिओत माधुरीच्या पायाला काहीतरी लागल्याचे दिसते, तसेच तिची काळजी घेणाऱ्या माणसाने तिला ज्याप्रकारे पकडले आहे. त्याबद्दलही लोकांनी आक्षेप घेतला आहे.
वनताराच्या त्या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
वनताराने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये माधुरीच्या मागच्या पायाला काहीतरी पट्टी लावल्यासारखं दिसून येत आहे. या व्हिडीओवरती अनेकांनी कमेंट करायला सुरुवात केली आहे. तिला पहिल्याच दिवशी दुखापत झाली, तिची काळजी व्यवस्थित घेतली जात नाही. जो व्यक्ती त्या व्हिडीओमध्ये दिसतो आहे, त्याने माधुरीला चिमटीमध्ये पकडलं आहे, अशा प्रकारचे कमेंट नेटकरी करू लागले आहेत. माधुरी वनतारामध्ये पोहोचताच तिचा हा पहिलाच फोटो समोर आला आहे आणि त्यावर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
View this post on Instagram
जैन समाजामध्ये मोठा संताप
नांदणी गावातील श्री जिनसेन मठामधील 'माधुरी' हत्तीला जामनगर (गुजरात) येथील वनतारा उद्यानामध्ये हलविल्याच्या निषेधार्थ सकल जैन समाजाने मोठा संताप व्यक्त केला आहे. या विरोधात तीव्र आंदोलन छेडले असून रिलायन्स कंपनीच्या पोस्टरला जोडे मारून तीव्र निषेध करण्यात आला. तसेच उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय समाजाने घेतला.
नेमकं प्रकरण काय?
महादेवी हत्तीणीचा वन विभागाकडून परवानगी न घेता मिरवणुकीसाठी वापर झाल्याचा आरोप 'पेटा'ने केला. प्रकरण न्यायिक पातळीवर पोहोचल्यानंतर चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. समितीने हत्तीणीची पाहणी करून अहवाल सादर केला होता. यानंतर प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण नोंदवलं होतं.
कोल्हापुरातील नांदणी इथला मठ जैन धर्मियांच्या श्रद्धेचं ठिकाण मानलं जातो. या मठात मागील ३३ वर्षांपासून महादेवी (माधुरी) नावाची हत्तीणीचा सांभाळ करण्यात आला. मात्र याच हत्तीणीला गुजरातच्या वनतारा येथे नेण्यात आलं आहे. हत्तीणीला गुजरातमधील वनतारामध्ये पाठवण्याचा निर्णय हायकोर्टानं दिल्यानंतर नांदणी ग्रामस्थांनी सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलं होतं, मात्र तिथही त्यांना निराशा मिळाली होती.