कोप्पल : कर्नाटकमधील कोप्पल येथे राहणाऱ्या एका माजी लिपिकाच्या घरातून लोकायुक्तांनी ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त केली. आरोपी माजी लिपिकाचे नाव कलाकप्पा निदागुंडी आहे. आरोपी लिपिकाच्या घरातून लोकायुक्तांनी २४ घरे, ४ भूखंड, ४० एकर शेती जमीन, ३५० ग्रॅम सोने, १.५ किलो चांदी आणि चार वाहने अशी ३० कोटी रुपयांची मलमत्ता जप्त केली.
दरमहा १५ हजार रुपये पगार घेणाऱ्या कलाकप्पा निदागुंडीने ३० कोटी रुपयांची मालमत्ता उभारली. यातील काही मालमत्ता कलाकप्पा निदागुंडीच्या नावावर तर काही त्याच्या पत्नीच्या नावावर असल्याचे लोकायुक्तांच्या प्राथमिक तपासात आढळले.
कलाकप्पा निदागुंडी विरोधात लोकायुक्तांकडे तक्रार आली होती. कोप्पळचे आमदार के. राघवेंद्र हितनल यांनी या प्रकरणात तपास होईल असे आश्वासन दिले होते. यानंतर लोकायुक्तांच्या मार्गदर्शनात कलाकप्पा निदागुंडीच्या घरावर धाड पडली होती. कलाकप्पा निदागुंडी आणि माजी केआरआयडीएल अभियंता झेड.एम. चिंचोलकर यांनी ९६ अपूर्ण प्रकल्पांसाठी बनावट कागदपत्रे तयार करून ७२ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा अपहार केल्याचा आरोप आहे. य प्रकरणात झालेल्या जप्तीमुळे कलाकप्पा निदागुंडीच्या अडचणी वाढल्याची शक्यता व्यक्त होत आहे.