
गेल्या वर्षी १.२५ लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्यात आले होते. मात्र, काही गोविंदा त्यापासून वंचित राहिले. यंदा ही त्रुटी दूर करत विमा कवचाची मर्यादा वाढवून १.५० लाख गोविंदांपर्यंत हे संरक्षण पोहोचवले जाणार आहे.
यावर्षी राज्यभरातील अंदाजे १.५० लाख गोविंदांना विमा संरक्षण प्रदान करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत "दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, मुंबई" या कंपनीचा प्रस्ताव शासनाने मान्य केला आहे. महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन, अंधेरी (पूर्व), मुंबई यांच्यामार्फत आवश्यक कागदपत्रे सादर करून विमा रकमेचा खर्च शासनाकडून अदा केला जाणार आहे. क्रीडा व युवक सेवा विभाग, मुंबई यांना या संदर्भात सुसंवाद आणि आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
एकूण एक कोटी बारा लाख ५० हजार रुपये इतक्या रकमेचा विमा प्रस्ताव अंतिम करण्यात आला आहे. त्यानुसार उप सचिव (सुनील पांढरे) यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या शासन आदेशानुसार संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करून गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी ही योजना तत्काळ राबवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.