Saturday, October 25, 2025
Happy Diwali

IND vs ENG : भारताच्या गोलंदाजांचा भेदक मारा, इंग्लंडचा पहिला डाव २४७ धावांवर संपुष्टात

IND vs ENG : भारताच्या गोलंदाजांचा भेदक मारा, इंग्लंडचा पहिला डाव २४७ धावांवर संपुष्टात

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडच्या संघाचा टिकाव लागू शकलेला नाही. इंग्लंडचा पहिला डाव केवळ २४७ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडकडे केवळ २३ धावांची आघाडी आहे. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी ४ बळी घेत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडले. भारताच्या गोलंदाजांनी कमाल केली आहे. दुसऱ्या दिवशी लंचनंतर भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन केले आणि इंग्लंडला एकामागोमाग एक झटके दिले.

सगळ्यात आधी प्रसिद्ध कृष्णाने जॅक क्राऊलीला पॅव्हेलियनला पाठवले. क्राऊलीने ५७ बॉलमध्ये ६४ धावा केल्या. त्यानंतर मोहम्मद सिराजने कर्णधार ओली पोपला, ज्यो रूट आणि जॅकब बेथेल या तिघांना एलबीडब्लू केले. बेथेल बाद झाल्यावेळेस इंग्लंडची धावसंख्या ५ बाद १९५ होती. यानंतर प्रसिद्ध कृष्णाने जेमी स्मिथ आणि जेमी ओवर्टनला एकाच षटकांत बाद केले.

हा सामना भारतीय संघासाठी करो वा मरोचा आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वातील भारतीय संघ हा सामना जिंकल्यास ते या सामन्यात बरोबरी करू शकतील. जर हा सामना अनिर्णीत राहिला अथवा इंग्लंडने विजय मिळवल्यास टीम इंडिया ही मालिका गमावतील.

पहिल्या डावात इंग्लंडची सुरूवात धमाकेदार झाली. बेन डकेट आणि जॅक क्राऊलीने भारतीय गोलंदाजांची लय बिघडवली. दोघांनी वनडे स्टाईलमध्ये बॅटिंग करताना १२.५ षटकांत ९२ धावांची भागीदारी केली. आकाशदीपने डकेटला बाद करत ही भागीदारी तोडली. डकेटने ५ चौकार आणि दोन षटकाराच्या मदतीने ३८ बॉलमध्ये ४३ धावा केल्या. डकेट बाद झाल्यानंतर काही वेळाने क्राऊलीने ४२ धावांवर आपले अर्धशतक पूर्ण केले.

याआधी भारताने पहिल्या डावात सर्वबाद २२४ धावा केल्या. भारताकडून करुण नायरने सर्वाधिक ५७ धावा केल्या.भारताला ३८ अवांतर चेंडूंचा फायदा मिळाला. यशस्वी जयस्वाल २, केएल राहुल १४, साई सुदर्शन ३८, कर्णधार शुभमन गिलने (धावचीत) २१, रविंद्र जडेजाने ९, यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलने १९, वॉशिंग्टन सुंदरने २६ धावांचे योगदान दिले. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा शून्य धावा करुन बाद झाले तर आकाशदीप शून्य धावांव नाबाद राहिला. भारताकडून करुण नायर आणि साई सुदर्शन हे दोनच फलंदाज दीर्घकाळ मैदानावर पाय रोवून उभे होते. इंग्लंडकडून गस अ‍ॅटकिन्सन पाच, जोश टंगने तीन आणि ख्रिस वोक्सने एक बळी बळी घेतला.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >