उन्हाळ्यात प्रमुख महानगरांमध्ये जमिनीजवळील ओझोन प्रदूषण लक्षणीयरीत्या वाढले. गेल्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या तुलनेत ही २९ टक्के वाढ आहे. मार्च ते मे २०२५ दरम्यान ३१ दिवसांसाठी ओझोनची पातळी मानकांपेक्षा जास्त होती.
सेंटर फॉर सायन्स अॅण्ड एन्व्हायर्नमेंट’च्या माहितीनुसार २०२५च्या उन्हाळी हंगामात प्रमुख महानगरांमध्ये जमिनीजवळील ओझोन प्रदूषण लक्षणीयरीत्या वाढले. कोलकाता, बंगळूरु, मुंबई, हैदराबाद आणि चेन्नईमध्ये सरासरी आठ तासांच्या कालावधीसाठी ओझोन पातळी मानकांपेक्षा जास्त दिवस अधिक नोंदवली गेली. एकाच वेळी अनेक प्रदूषकांच्या आव्हानामुळे लहान मुलांसह नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
‘एअर क्वालिटी ट्रॅकर’ उपक्रमांतर्गत ‘सीएसई’च्या अर्बन लॅबने केलेल्या नवीनतम वायू गुणवत्ता विश्लेषणात आढळून आले, की प्राथमिक प्रदूषकांच्या विपरीत ओझोन थेट स्त्रोतातून उत्सर्जित होत नाही. वाहने, वीज प्रकल्प, कारखाने आणि इतर ज्वलनशील स्रोतांमधून उत्सर्जित होणारे नायट्रोजन ऑक्साईड (एनओएक्स), अस्थिर सेंद्रिय संयुगे आणि कार्बन मोनोऑक्साइड यांच्या सूर्यप्रकाशात होणाऱ्या प्रतिक्रियांमधून हा वायू तयार होतो. पृष्ठभागावरील ओझोन शहरी भागातच साचत नाही, तर ते लांब अंतरावर पसरू शकते आणि प्रादेशिक प्रदूषक बनू शकते. त्याचा कृषी उत्पादकतेवरही परिणाम होतो. त्यामुळे अन्नसुरक्षेला धोका निर्माण होतो. ‘सीएसई’च्या स्वच्छ हवा कार्यक्रमाच्या कार्यकारी संचालक आणि प्रमुख अनुमिता रॉयचौधरी म्हणतात की, नियंत्रण ठेवले नाही, तर हे एक गंभीर सार्वजनिक आरोग्य संकट बनू शकते. कारण ओझोन हा एक अत्यंत प्रतिक्रियाशील वायू आहे आणि अल्पकालीन संपर्कातदेखील मानवासाठी हानिकारक असू शकतो. उत्तर भारतातील शहरांमध्ये उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमुळे आणि तेजस्वी सूर्यप्रकाशामुळे ओझोनची पातळी वाढते; परंतु उष्ण हवामान असलेल्या शहरांमध्ये, इतर ऋतूंमध्ये हिवाळा आणि वसंत ऋतूमध्येही हा अतिरेक सातत्याने दिसून येतो. ओझोन नियंत्रणासाठी वाहने, उद्योग आणि सर्व प्रकारच्या ज्वलन स्रोतांद्वारे उत्सर्जित होणाऱ्या अनेक वायूंवर कठोर नियंत्रण आवश्यक आहे.
‘सीएसई’च्या पुनरावलोकनात असेही आढळून आले की, पृष्ठभागावरील ओझोन श्वसनमार्गात जळजळ निर्माण करते. यातून संसर्ग होण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे दमा, क्रॉनिक ब्राँकायटिस आणि एम्फिसीमासारखे श्वसन रोग होऊ शकतात. मुले, वृद्ध आणि अविकसित फुप्फुसे असलेले लोक जास्त असुरक्षित असतात. ओझोनच्या संपर्कात आल्याने वारंवार दम्याचे झटके येतात. ओझोन हा अतिशय जलद प्रतिक्रिया देणारा वायू असल्याने मोजणीसाठी २४ तासांऐवजी आठ तासांची सरासरी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
पृष्ठभागावरील ओझोन प्रदूषण अत्यंत परिवर्तनशील आणि स्थानिक आहे आणि ते ठिकाणानुसार बदलते. ओझोननिर्मिती जटिल रासायनिक प्रक्रिया आणि प्रकाश-रासायनिक अभिक्रियांवर अवलंबून असते. त्यामुळे त्याची पातळी वेळ आणि स्थानानुसार बदलते. सूर्यप्रकाश, उष्ण हवामान आणि स्थिर वारे त्याच्या निर्मितीमध्ये भूमिका बजावतात. या अभ्यासात महानगरातील प्रत्येक स्थानकावर मानक ओलांडले गेलेल्या दिवसांचा मागोवा घेतला गेला. शहरातील एका स्थानकानेदेखील मानक ओलांडले, तर ते त्या शहरासाठी ‘मानक उल्लंघन’ मानले जाते. एकाच दिवशी अनेक स्थानके मानक ओलांडली, तर ते प्रदूषण किती मोठ्या प्रमाणात पसरले आहे आणि किती लोक प्रभावित होत आहेत हे सांगते. या अभ्यासात आंतरराष्ट्रीय मानकांनुसार ‘यूएस ईपीए’ची पद्धत स्वीकारण्यात आली आहे. याअंतर्गत दिवसाच्या प्रत्येक आठ तासांच्या सरासरी ओझोनपातळीची गणना केली जाते आणि त्यापैकी सर्वोच्च मूल्य त्या दिवसाची ओझोन पातळी मानले जाते. ‘यूएस ईपीए’नुसार शहर किंवा प्रदेशाचा ‘एक्यूआय’ त्या दिवशी सर्व स्थानकांवर नोंदवलेल्या सर्वोच्च मूल्याच्या आधारे निश्चित केला जातो. यंदाच्या उन्हाळ्यात १ मार्च ते ३१ मे दरम्यान मुंबईत ९२ पैकी ३२ दिवस ओझोनचे उल्लंघन नोंदवले गेले. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हे ४२ टक्के घट दर्शवते.
२९ मार्च हा सर्वात वाईट दिवस ठरला. या दिवशी शहरातील ३१ पैकी ८ निरीक्षण केंद्रांनी ओझोनची पातळी प्रमाणापेक्षा जास्त नोंदवली. या कालावधीत मुंबईत चकाला येथे प्रादेशिक कमाल पृष्ठभागावरील ओझोन सांद्रता ९० मायक्रोग्राम प्रति घनमीटर इतकी होती. तिथे मार्च ते मे दरम्यान २९ दिवस ओझोन मानकांचे उल्लंघन झाले. पृष्ठभागावरील ओझोनचे वितरण सामान्यतः नायट्रोजन डायऑक्साइड (एनओ)सह उलट संबंध दर्शवते. विशेषतः जास्त रहदारी असलेल्या भागात नायट्रोजन ऑक्सिजनची पातळी जास्त असते, तिथे ओझोनची निर्मिती बहुतेकदा कमी असते. कारण ओझोन ‘नायट्रिक ऑक्साईड’शी प्रतिक्रिया देतो आणि विरघळतो. शहराच्या वेगवेगळ्या भागात ओझोनची पातळी विविध घटकांमुळे बदलते; जसे की इतर प्रदूषकांचे परिणाम, हवामान आणि उत्सर्जन स्रोत. मे २०२५ ची तुलना मे २०२४ शी केल्यास पृष्ठभागावरील ओझोन सूर्यास्तानंतर जास्त काळ वातावरणात राहतो, असे आढळते. तथापि, २०२५ च्या उन्हाळ्यात सरासरी तासाला कमाल ओझोन सांद्रता मागील वर्षाच्या तुलनेत ३५ टक्के कमी होती. जी वातावरणातील रसायनशास्त्रात बदल किंवा ओझोन तयार करणाऱ्या पूर्वसूचक प्रदूषकांच्या उत्सर्जनात घट दर्शवते.
दैनंदिन ट्रेंड दर्शवतात की, सकाळी आणि संध्याकाळी नायट्रोजन ऑक्सिजनची पातळी जास्त असते, तेव्हा ते ओझोनला निष्क्रिय करण्यास आणि विखुरण्यास मदत करते; परंतु नायट्रोजन ऑक्सिजनची पातळी तुलनेने कमी असते तेव्हा दुपारी किंवा कमी गर्दीच्या वेळेत ओझोनची पातळी वाढते. मुंबईत हिवाळ्यात (डिसेंबर ते फेब्रुवारी) पृष्ठभागावरील ओझोन पातळी जास्त असते. २०२४-२५ च्या हिवाळ्यात शहरात ८७ दिवसांसाठी ओझोन पातळी प्रमाणापेक्षा जास्त होती. गेल्या वर्षीच्या हिवाळ्याच्या तुलनेत त्यात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोलकातामध्ये ९२ पैकी सुमारे २२ दिवस ओझोन पातळी प्रमाणापेक्षा जास्त होती. गेल्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या तुलनेत हे ४५ टक्के घट दर्शवते. या उन्हाळ्यात सरासरी तासिक ओझोन कमाल पातळी देखील २२ टक्क्यांनी कमी झाली. हे एकूण सुधारणा दर्शवते. कोलकातामध्ये हिवाळ्यात (नोव्हेंबर ते फेब्रुवारी) पृष्ठभागावरील ओझोन सांद्रता सातत्याने जास्त नोंदवली गेली. ही प्रवृत्ती वातावरणीय परिस्थिती, तुलनेने उष्ण हवामान, प्रकाश रासायनिक अभिक्रिया आणि उत्सर्जन पातळीमुळे आहे. या वर्षी १ मार्च ते ३१ मे या कालावधीत ९२ पैकी ४५ दिवसांसाठी बंगळूरुमध्ये ओझोनची पातळी हवेच्या गुणवत्तेच्या मानकांपेक्षा जास्त होती. गेल्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या तुलनेत ही २९ टक्के वाढ आहे. मार्च ते मे २०२५ दरम्यान ३१ दिवसांसाठी ओझोनची पातळी मानकांपेक्षा जास्त होती.
हैदराबादमधील हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण केंद्रांनी या वर्षी १ मार्च ते ३१ मे दरम्यान सामान्य ओझोन पातळीपेक्षा २० दिवस जास्त नोंदवले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही ५५ टक्के घट आहे. बोलारम हे हैदराबादमधील सर्वात जास्त प्रभावित क्षेत्र आहे, जिथे मार्च ते मे दरम्यान १७ दिवस सामान्य ओझोन पातळीपेक्षा जास्त होते. १ मार्च ते ३१ मे या काळात चेन्नईमध्ये ९२ पैकी १५ दिवस ओझोनची पातळी मानकांपेक्षा जास्त नोंदवली गेली, असे शहराच्या हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्रांच्या आकडेवारीवरून दिसून येते. २०२३ च्या उन्हाळ्यात तीन दिवस आणि २०२२ मध्ये १९ दिवस ओझोनचे उल्लंघन नोंदवले गेले. अलंदूर हे चेन्नईमधील सर्वात जास्त प्रभावित क्षेत्र आहे. मार्च ते मे दरम्यान येथे १५ दिवस मानकांपेक्षा जास्त पातळी नोंदवली गेली. शहरातील इतर स्थानकांवर कोणतेही उल्लंघन नोंदवले गेले नाहीत. सध्या भारतातील मोठी शहरे प्रदूषणाच्या झळा सोसत आहेत.
- मिलिंद बेंडाळे, पर्यावरण अभ्यासक