
मुंबई : १७ वर्षे न्यायालयीन सुनावणी, हजारो पुरावे आणि शेकडो साक्षीदार! २९ सप्टेंबर २००८साली मालेगाव शहर हादरवणाऱ्या भीषण बॉम्बस्फोटाला (Malegaon Blast Case Verdict) आज जवळपास १७ वर्षं पूर्ण होत आहेत. भिक्खू चौकात झालेल्या या स्फोटात ६ निरपराध नागरिकांचे प्राण गेले. तर १०० हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. आता तब्बल १७ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल मुंबईच्या एनआयए या विशेष न्यायालयात आज ( दि.३१) लागणार आहे. थोड्याच वेळात हा निकाल समोर येईल. या निकालामुळे कोणतीहा तणाव निर्माण होऊ नये याची खबरदारी पोलीस घेत आहेत. महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे खिळलं आहे.
मालेगाव पोलिस अलर्ट मोडवर
मालेगावमध्ये २००८ मध्ये बॉम्बस्फोट झाला होता. मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी अंजुमन चौक ते भीकू चौक या दरम्यान असलेल्या शकील गुड्स ट्रान्सपोर्ट कंपनीसमोर स्फोट झाला होता. रात्री ९:३५ मिनिटांनी हा स्फोट झाला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता तर १०१ जण जखमी झाले होते. त्यानंतर आज मुंबईत या खटल्याचा निकाल लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर मालेगावात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मालेगाववासीयांसह देशाचे लक्ष या खटल्याकडे लागले आहे. चौकाचौकात पोलिसांची नजर असणार आहे. पोलीस अलर्ट मोडवर आहे. अतिरिक्त पोलिस कर्मचारी कुमक लक्ष ठेवणार आहे. २०० पेक्षा जास्त पोलिस कर्मचारी, २० पेक्षा जास्त अधिकारी बंदोबस्त करणार असल्याची माहिती, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक तेगबीरसिंग संधू यांनी दिली.