नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपची ताकद मोठ्या प्रमाणावर नक्कीच वाढली आहे. असे असले तरीही, नाशिकमध्ये चालू असलेले अनेक प्रकल्प बऱ्याच वर्षांपासून रखडलेले आहेत. भाजपची ताकद जरी वाढली असली तरी फक्त मतदारसंघ व निवडणुकांच्या दृष्टीमुळे अनेक विकासकामे रखडली आहेत, याबाबत घेतलेला विशेष धांडोळा...
प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाशिकचे नेतृत्व पुढे येण्यास संधी देणार का? नाशिकचे नेतृत्व असेल तर नाशिकचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सुटण्यास मदत होईल. भाजप आता हाऊसफुल्ल झाले आहे. म्हणजे त्यांना १०० जागा जिंकण्यासाठी आवश्यक असलेला सक्षम उमेदवारांचा कोटा पूर्ण झाला आहे. निवडणुकीत लोक कदाचित भाजपला मागील निवडणुकांप्रमाणे मतदानही करतील. पण मतदारांच्या पदरात काय पडणार हा खरा प्रश्न आहे. नाशिकचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपच्या राज्य व राष्ट्रीय नेतृत्वाने नाशिकमधून नेतृत्व पुढे येण्यासाठी रस्ता मोकळा करण्याची गरज आहे. नाशिकचे नेतृत्व पुढे येऊ द्यायचे नाही व केवळ नाशिककरांची मते घ्यायची, ही बाब अन्यायकारक आहे. लोकशाहीत त्या भागाच्या विकासासाठी तेथील स्थानिक नेतृत्व सक्षम असणे फार गरजेचे असते.
नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची ताकद नक्कीच वाढली आहे. नाशिक शहरात तिन्ही भाजपच्या आमदारांनी हॅटट्रिक मारली आहे, परंतु नाशिकचे नेतृत्व पुढे येत नसल्याने आयटी प्रकल्प, नाशिक-पुणे रेल्वे मार्ग, न्यूओ मेट्रो, नमामी गंगा यासारखे अनेक प्रकल्प पूर्ण होत नसल्याची खंत नाशिककरांमध्ये आहे.
मंत्रभूमी म्हणून प्रसिद्ध असलेली नाशिक नगरी प्रथमच तंत्र भूमीकडे जोरदारपणे वाटचाल करत आहे. मुंबई-पुण्याच्या सुवर्ण त्रिकोणातील नाशिक शहर गेल्या काही वर्षांपासून सर्व क्षेत्रात आघाडी घेत आहे. प्रभू श्रीरामचंद्रांची पावनभूमी असलेली नाशिक नगरी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक भगवान त्र्यंबकेश्वर, साडेतीन शक्तिपीठांपैकी सप्तशृंगी निवासिनी मंदिर जिल्ह्याचे अध्यात्मिक शक्ती स्थळे आहेत. उद्योग क्षेत्रातही नाशिक आता उत्तुंग अशी भरारी घेत आहेत.
काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षात उबाठा, राष्ट्रवादी (शरद पवार)सह इतर काही पक्षातून पदाधिकारी, कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. त्यामुळे आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजप शक्तिमान नक्कीच झाला आहे. नाशिकच्या इतिहासात २०१७ मध्ये महापालिकेत भाजपाचे तब्बल ६६ नगरसेवक विजयी होत पक्षाने एकहाती सत्ता आणली होती. विधानसभेत देखील जिल्ह्यात भाजपचे ५ आमदार, तर शहरातील तिन्ही विधानसभा जागांवर भाजपने बाजी मारली आहे. त्यामुळे नाशिकला मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा यंदाही फोल ठरली आहे. त्यामुळे नाशिकचे प्रश्न विधिमंडळात मांडले जात नाहीत. पाचही आमदार आपल्या परीने पोटतिडिकीने प्रश्न मांडत आहेत.
गेल्या विधानसभा निवडणूक प्रचारात ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतले असल्याची घोषणा देखील केली होती. त्यानुसार नाशिकचा विकास होत आहे, परंतु अपेक्षित असे प्रकल्प वर्षानुवर्ष मार्गी लागत नसल्याने नागरिकांमध्ये काहीशी नाराजी आहे. महापालिकेच्या दृष्टीने प्रत्येक प्रभागातील स्ट्राँग उमेदवार भाजप शोधत आहे. आपल्या पक्षात नसेल तर विरोधी पक्षाचा पदाधिकारी, कार्यकर्त्यांना गळ लावली जात आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष नाशिक जिल्ह्यात क्रमांक १ चा राहील, यात शंका नाही. परिणामी विरोधकांची पायाखालची वाळू सरकली आहे.
संपूर्ण देशात गेल्या अकरा वर्षांत खूप प्रगती झाली. अनेक प्रकल्प मार्गी लागले. केंद्र सरकारने १०० लाख कोटी खर्च करण्याचा संकल्प केला. पण त्यातील किती प्रकल्प नाशिकला आले? त्यातून नाशिकचे किती रेंगाळलेले प्रकल्प मार्गी लागले? एकही नाही. कारण केंद्रातील व राज्यातील सरकारकडे मतदारसंघाच्या संकुचित चष्म्यापलीकडे बघणारे नेतृत्व भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने विकसित होऊ दिले नाही हे प्रमुख कारण आहे.
हनी ट्रॅपप्रकरणी नाशिक, जळगाव केंद्रस्थानी
राज्यात हनी ट्रॅपप्रकरण चांगलेच गाजत आहेत. अधिवेशनात देखील या हनी ट्रॅपचे चांगलेच पडसाद उमटले होते. अनेक राजकीय नेते आणि शासकीय अधिकारी यात अडकले असल्याचे बोलले जात आहेत. यासाठी नाशिकमधील मध्यवर्ती ठिकाणचे हॉटेल आणि काँग्रेसचे माजी पदाधिकारी चांगलेच चर्चेत आले आहेत.
- धनंजय बोडके