Thursday, March 26, 2026

कुर्ल्यातील भाभा रुग्णालय भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरले; औषध तुटवडा, भ्रष्टाचाराचे आरोप आणि रुग्णांचे हाल

कुर्ल्यातील भाभा रुग्णालय भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरले; औषध तुटवडा, भ्रष्टाचाराचे आरोप आणि रुग्णांचे हाल

मुंबई : कुर्ल्यातील भाभा रुग्णालय सध्या जबरदस्त वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. एकेकाळी दर्जेदार आरोग्यसेवेसाठी ओळखले जाणारे हे बीएमसीचे रुग्णालय आता औषधांच्या तुटवडा, व्यवस्थेतील बिघाड आणि कथित भ्रष्टाचारामुळे जनतेच्या रोषाचे केंद्र बनले आहे.

माजी नगरसेविका दिलशाद अश्रफ आझमी यांनी आरोप केला आहे की, गेल्या दीड वर्षांपासून रुग्णालयात औषधांचा कायमस्वरूपी तुटवडा आहे. "स्पॉट कोटेशनने वारंवार २५ लाखांची औषध खरेदी केली जाते, पण रुग्णांपर्यंत त्या औषधांचा पोहोच फारच कमी असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना खासगी दुकानांतून महागडी औषधे विकत घ्यावी लागत आहेत.

येथील एक समाजसेवक अकील खाटीक यांनी भाभा रुग्णालयाला "भ्रष्टाचाराचा अड्डा" असे संबोधून व्यवस्थेवर घणाघाती टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, औषधांचे चार काउंटर असूनही, एकाच काउंटरवर रांगा लागतात आणि संध्याकाळी बहुतेक वेळा सर्व काउंटर बंद असतात. यामुळे रुग्णांच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत.

याशिवाय, रुग्णालयातली स्वच्छता, सुविधा आणि सुरक्षा यांचाही अभाव जाणवतो. ओपीडी परिसरातील शौचालये बंद, सीटी स्कॅन विभागात मोकाट कुत्रे आणि बांधकामाचा ढिगारा रुग्णांना त्रासदायक ठरत आहे. विशेषतः महिलांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने "तुटवड्याची परिस्थिती नियंत्रणात आहे" असे सांगत सेवा सुधारण्याचे आश्वासन दिले असले, तरी रुग्णांचे आरोप वेगळंच चित्र मांडतात. डॉक्टर वेळेवर न येणे, उपकरणं बंद पडणे आणि दीर्घ प्रतीक्षा हे इथलं नित्याचं दृश्य बनले आहे. यामुळे मुंबईतील सर्वात जुन्या नागरी रुग्णालयांपैकी एकाची वास्तविक स्थिती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा