Saturday, October 25, 2025
Happy Diwali

विद्याविहार उड्डाणपुलाचे काम ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

विद्याविहार उड्डाणपुलाचे काम  ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

डिसेंबरपर्यंत पूर्व बाजूकडील सर्व कामे करणार पूर्ण

मुंबई  : विद्याविहार रेल्वे स्थानकावरून जाणारा पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा उड्डाणपूल महापालिकेच्या वतीने बांधण्यात येत आहे. या प्रकल्पाचे संपूर्ण काम ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. तरीही या पुलाच्या पूर्व बाजूकडील सर्व कामे ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करावीत.

तर, पश्चिम बाजूकडील बाधित बांधकामांची पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करुन पावसाळ्यानंतर पाडली जावीत. त्यानंतर, पुढील ५ महिन्यांत पुलाची उर्वरित कामे जलद गतीने मार्गी लावावीत. प्रकल्पामुळे बाधित व्यक्तींचे पर्यायी घरे देऊन पुनर्वसन करावे. त्यासाठी कालमर्याद निश्चित करावी, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले.

‘एन’ विभाग हद्दीत, घाटकोपर परिसरात पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडण्यासाठी विद्याविहार रेल्वे स्थानक रुळांवरून जाणारा उड्डाणपूल महानगरपालिकेच्या पूल विभागाच्या वतीने बांधण्यात येत आहे. या उड्डाणपुलाच्या निर्मितीमध्ये रेल्वे रुळांवरून जाणारा सुमारे १०० मीटर अंतराचा मुख्य पूल समाविष्ट आहे. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी मंगळवारी २९ जुलै २०२५ या प्रकल्प कामाचा महानगरपालिका मुख्यालयातील बैठकीत आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.

लालबहादूर शास्त्री मार्ग व रामचंद्र चेंबूरकर मार्ग यांना जोडणारा हा उड्डाणपूल एकूण दोन मार्गिकांचा आहे. एकूण ६५० मीटर लांबीच्या या प्रकल्पात रेल्वे रुळांवर १०० मीटर पूल, तर पूर्व बाजूस २२० मीटर आणि पश्चिम बाजूला ३३० मीटर पोहोच मार्ग बांधण्यात येत आहे. या उड्डाण पुलावरून विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या फलाटांवर जाण्यासाठी जोडमार्गही दिला जात आहे. त्यासोबतच दोन्ही बाजूचे रेल्वे तिकीट खिडकी कक्ष, स्थानक मास्तर कार्यालय, जीना यांचीही पुनर्बांधणी या प्रकल्पांतर्गत केली आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये पुलाच्या पूर्व व पश्चिम बाजूंकडील १७.५० मीटर रुंदीच्या पोहोच रस्त्यांचे काम करण्यात येणार आहे. प्रकल्पाचे संपूर्ण काम ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे नियोजन आहे.

त्यापूर्वी पूर्व बाजूकडील बहुतांशी कामे नियोजित कालमर्यादेत म्हणजेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यात नाल्याच्या बाजूकडील उपरस्त्याच्या रूंदीकरण कामाचाही समावेश आहे. प्रकल्पामुळे बाधित व्यक्तींचे पर्यायी घरे देऊन पुनर्वसन केले जाणार आहे, असे विविध निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Comments
Add Comment