Saturday, August 2, 2025

नाशिक मनपा घेणार आणखी तीनशे कोटींचे कर्ज

नाशिक मनपा घेणार आणखी तीनशे कोटींचे कर्ज

महापालिका आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता


नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका तयारीला लागली आहे. शहरात अत्यावश्यक कामे केली जाणार आहेत. प्रारंभी मलवाहिकांच्या कामांसाठी दोनशे कोटींच्या कर्जरोखे बॉण्डच्या मंजुरीनंतर प्रशासन आणखी तीनशे कोटींच्या कर्जरोख्यांची उचल राष्ट्रीयीकृत बँकांतून घेण्याच्या तयारीत आहे.दरम्यान, सिंहस्थासाठीचा हिस्सा देण्याकरिता महापालिकेने कर्जरोख्यांसाठी केलेला अवलंब हा आर्थिक अडचणीत आणून कर्जाकडे नेणारा ठरू शकतो.


आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मलवाहिकांचे जाळे विस्तारले जाणार असून, त्यासाठी २८५ कोटींचा खर्च आहे. या प्रकल्पाकरिता दोनशे कोटींचे कर्जरोखे बॉण्ड उभारणीला महापालिकेच्या महासभेने हिरवा कंदील दाखविला होता. त्यानंतर सिंहस्थातील हिश्श्यासाठीची तयारी म्हणून तीनशे कोटींचे कर्जरोखे बँकांकडून घेतले जाणार आहेत. सिंहस्थात येणार्‍या साधू- महंत व कोट्यवधी भाविकांना महापालिकेच्या माध्यमातून विविध सोयीसुविधा पुरविल्या जाणार आहेत. त्यासाठी महापालिकेने सिंहस्थ आराखडा तयार केला आहे. सिंहस्थकाळात गोदावरी प्रदूषणमुक्त राहण्यासाठी मलनिस्सारण योजनेंतर्गत शहरात मलवाहिकांचे जाळे निर्माण केले जाणार आहे. त्यासाठी २७५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या योजनेसाठी बॉण्डच्या कर्जरोख्यांच्या माध्यमातून दोनशे कोटींची उभारणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इतर आवश्यक कामे करण्यासाठी तीनशे कोटींच्या कर्जरोख्यांची उचल घेण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू केले आहेत. २०१५ साली झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यावेळी महापालिकेने २५ टक्के हिस्सा दिला होता. त्यामुळे मनपाचा हिस्सा जो काही असेल त्या रकमेसाठी कर्जरोख्यांची मदत घेतली जात आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या द़ृष्टीने शहरात अद्याप कामे सुरू केलेली नाहीत. सिंहस्थ प्राधिकरणाची स्थापना झाली असली, तरी पंधरा हजार कोटींच्या निधीबाबत कुठेही कार्यतत्परता दिसत नसल्याचे
चित्र आहे.


शहरात नव्याने पूल, रस्ते, आरोग्यविषयक कामांसह महत्त्वाचे विषय सिंहस्थापर्यंत पूर्ण होणे अत्यावश्यक आहे. महापालिकेचे अंदाजपत्रक तेवीसशे कोटींचे असून, महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोेत करवसुली, बांधकाम परवानगी, वस्तू व सेवाकर (जीएसटी,) शासनाकडून मिळणारे अनुदान व विविध माध्यमांतून उत्पन्न मिळते. त्यात शहरात दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने महापालिकेला २५ टक्के निधी केल्या जाणार्‍या कामांसाठी उभारावा लागतो.



मनपाकडे एकूण सोळाशे कोटींच्या ठेवी


महापालिकेच्या सध्या सोळाशे कोटींच्या ठेवी आहेत. त्यांची मुदत पुढील वर्षीच्या ३१ मार्च रोजी संपुष्टात येत आहे. अशावेळी प्रशासनाला कर्जरोख्यांची आवश्यकता वाटल्यास बँकेतील या ठेवींतील काही रक्कम टप्प्याटप्प्याने काढली जाऊ शकते.
Comments
Add Comment