पहलगाम या काश्मिरातील निसर्गरम्य स्थळी भारतातील पर्यटक फिरायला गेले असताना कसलाही अपराध नसताना त्यांचे शिरकाण करण्यात आले आणि तेही अत्यंत क्रूरपणे. त्यांचा धर्म विचारून त्यांना कलमा पढण्यास भाग पाडले. या घटनेमुळे सारा देश हादरला होता आणि दहशतवाद्यांविरोधात सारा देश पेटून उठला. एप्रिल २०२५ रोजी हे हत्याकांड झाले आणि २६ नागरिक ठार झाले. २६ महिलांचे कुंकू पुसले गेले. या नृशंस हत्याकांडाला जबाबदार असलेल्या तीन अतिरेक्यांना नुकतेच काश्मीरमधील एका राष्ट्रीय उद्यानात भारतीय सैन्याच्या पथकाने ठार केले. या ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये सुलेमान जो पहलगाम हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार होता तो ठार झाला. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत गरमागरम चर्चा सुरू असतानाच ही बातमी आल्याने विरोधकांच्या विशेषतः काँग्रेसच्या चर्चेतील धारच निघूून गेली. समाजवादी पार्टीचे रमाशंकर राजभर हे सरकारला प्रश्न विचारण्यासाठी चांगली तयारी करून आले होते. त्यांच्या दाव्यातील धारच गेली. अर्थात अतिरेकी ठार झाल्याने विरोधकांचे प्रश्न गैरलागू होते. त्यांनी जो प्रश्न विचारला होता की, हत्याकांडाला जबाबदार अतिरेकी अजून मोकाट कसे, हा प्रश्न निरर्थक ठरला. दहशतवाद्यांना ठार मारून सुरक्षा दलांनी मोठा विजय मिळवला. या हल्ल्याचा सूत्रधार लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी सुलेमान शाह होता असे सांगण्यात आले. एवढी माहिती देण्यात आल्यावर खरेतर विरोधकांकडे तोंडच नव्हते. सुलेमान शाह हा एकेकाळी पाकिस्तानी सैन्यात होता आणि त्याला हाशिम मुसा म्हणूनही ओळखले जात होते.
'ऑपरेशन महादेव' सुरू केल्याचे सुरक्षादलांनी अनेकदा घोषित केले होते. पण हे दहशतवादी सापडले नव्हते. त्यामुळे सरकारचे जांबाज सैन्य रडारखाली आले होते. त्यातच राहुल गांधी आणि सपासारख्या पक्षांनी सरकारवर कठोर टीका करत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली होती. विरोधकांच्या बोचऱ्या प्रश्नांना उत्तरे देण्यास सरकार आता जास्त आत्मविश्वासाने सामोरे जाईल. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी कालच संसदेत स्पष्ट केले होते, की 'ऑपरेशन सिंदूर' अजून संपलेले नाही. भारतीय सैन्याने कुणालाही कळू न देता हे ऑपरेशन यशस्वी केले. ऑपरेशन सिंदूरबाबत चर्चा सुरू असतानाच विरोधकांची हवा काढून टाकणारी ही बातमी आल्याने त्यांची तर फजिती झालीच पण सरकारला मोठा दिलासा मिळाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माहिती देताना संसदेत सांगितले होते, की भारतीय हवाई दलाच्या वेगवेगळ्या उपकरणांद्वारे एअर डिफेन्स सिस्टीम आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांच्याद्वारे ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले आणि पाकिस्तानातील १०० हून अधिक दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. पण हत्याकांडास जबाबदार असलेले अतिरेकी मोकाटच फिरत होते आणि त्यामुळे भारतीय सरकार विरोधकांच्या रडारवर होते. पण या दहशतवाद्यांना कंठस्नान घालून सुरक्षादलांनी भारतीय सुरक्षेतील एक अध्याय पूर्ण केला आहे असे म्हणता येईल. पहलगाम हत्याकांडात २६ पर्यटकांची हत्या करण्यात आली होती आणि त्यांना कलमा पढायला लावून आणि काही पर्यटकांची सुंता झाली आहे की नाही हे पाहून त्यांना गोळ्या घालून ठार केले होते. त्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले. दहशतवाद्यांना ठार मारण्याच्या कारवाईला 'ऑपरेशन महादेव' हे नाव देण्यात आलेे. पहलगाम हे पर्यटनस्थळ आहे पण येथे असे हत्याकांड घडवून अतिरेक्यांनी वाढत असलेल्या पर्यटनाला खीळ बसवण्याचा प्रयत्न केला. आजही तेथील पर्यटन पुरते बहराला आले नाही. पण आता काही दिवसांनी पुन्हा पर्यटनाला बहर येईल अशी आशा तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यामुळे मिळाली. काश्मिरातील अन्य ज्या यात्रा आहेत त्यांना भारतीयांचा प्रतिसाद वाढणार आहे हे निश्चित. 'ऑपरेशन महादेव'मध्ये पहलगाम हत्याकांडातील तीन अतिरेकी ठार झाल्याची घोषणा जम्मू-काश्मीरच्या उपराज्यपालांनी केली आणि देशात आनंदाची लाट उसळली.
भविष्यात असे हत्याकांड होणार नाही कारण 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानी दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे आणि भारतीय सैन्याने आपण किती ताकदवान आहोत हे सिद्ध केले. आहे. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारताने जे हल्ले केले त्यात पाकिस्तानातील मुरीदके आणि अन्य ठिकाणी दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आणि त्यामुळे पाकिस्तान चांगलाच घाबरला आहे. त्यात या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला जाणारे सतलज नदीचे पाणी बंद केले आणि पाकवर आज त्राही माम असे म्हणण्याची वेळ आणली. भविष्यातही पाकने असेच काही दहशतवादी कृत्य केले तर ते भारतविरोधी युद्ध आहे असे समजले जाईल असा सज्जड दमही भारताने अगोदरच दिला आहे. त्यामुळे आता पाक असले काही दुःसाहस करणार नाही अशी आशा आहे. पण त्याने ते केलेच तर भारतीय लष्कर समर्थ आहे. पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईड या ऑपरेशनदरम्यान ठार झाला, हे चांगले झाले. आता भारताने पाकचा बदला पूर्णपणे घेतला आहे असे म्हणता येईल. आता भारताने जे मिनी पाकिस्तान भारतात आहेत त्यांच्यापासून दक्ष राहिले पाहिजे आणि जे अजूनही भारतात राहून पाकचे गोडवे गातात त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. 'ऑपरेशन सिंदूर' यशस्वी झाले आणि ज्यांनी आपले पती गमावले त्यांना न्याय मिळाला असे म्हणता येईल. पंतप्रधान मोदी यांच्या सरकारचे, भारतीय सैन्याचे यश आहे, या सर्वांना सलाम.