Sunday, August 24, 2025

दहिवडमध्ये बिबट्या जेरबंद

दहिवडमध्ये बिबट्या जेरबंद

नागरिकांमध्ये भीती कायम; आणखी पिंजऱ्यांची मागणी

देवळा : देवळा तालुक्यातील दहिवड येथील लवखाड मळ्यामध्ये अनेक दिवसांपासून दहशत माजवणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या प्रयत्नांमुळे जेरबंद झाला आहे. तुकाराम दाजीबा वाघ यांच्या शेतशिवारात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सोमवार, २८ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता हा बिबट्या अडकला. बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी विजय पगार, जी. जी. पवार, ठाकरे आणि भदाणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नागरिकांना सावधगिरीचा इशारा देत बिबट्याला ताब्यात घेतले.

जेरबंद बिबट्यानंतरही परिसरात बिबट्याचा वावर

एक बिबट्या जेरबंद झाल्यानंतरही दहिवड येथील लवखाड मळ्यात बिबट्याचा वावर कायम असल्याचे समोर आले आहे. मंगळवार, २९ जुलै रोजी सकाळी १० च्या सुमारास त्याच परिसरात एका बिबट्याने डाळिंब बागेत डरकाळी फोडून एका शेतकऱ्यावर चाल केली. भयभीत झालेल्या शेतकऱ्याने तातडीने घराच्या दिशेने पळ काढल्याने तो सुदैवाने बचावला. ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या मते, या परिसरात अजून दोन ते तीन बिबटे वास्तव्यास असून, यामुळे दहशतीचे वातावरण कायम आहे. भविष्यात कोणताही अनर्थ घडण्याआधी वन विभागाने पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

वन विभागाचे नागरिकांना आवाहन

दरम्यान, मौजे दहिवड, लवखाड मळा आणि परिसरातील शेतकऱ्यांसाठी वन विभागाने एक विशेष आवाहन केले आहे. आपल्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांनी, विशेषतः लहान मुलांची काळजी घ्यावी आणि दक्षता घेऊन शेतीची कामे करावीत, असे वन विभागाने म्हटले आहे. परिसरात काही संशयास्पद हालचाल किंवा बिबट्याचे अस्तित्व आढळल्यास सुरक्षित मार्गक्रमण करावे. तसेच, कोणत्याही वन्यजीवाला डिवचण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करू नये, असेही आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.
Comments
Add Comment