भाजपची पुढची तयारी

  53

स्वातंत्र्योत्तर काळामध्ये पुण्यातील राजकारणावर काँग्रेस पक्षाचा ठसा होता. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या काही दशकांत काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय राजकारणासोबत पुण्यातील स्थानिक राजकारणातदेखील अग्रस्थानी होता. पुणे पालिका, जिल्हा परिषद तसेच विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा वरचष्मा होता. अनेक नामवंत नेते पुण्यातून काँग्रेसचे नेतृत्व करत होते. बॅ. गाडगीळ यांच्यापासून सुरेश कलमाडी यांच्यापर्यंत अनेक नेत्यांनी पुण्याच्या नेतृत्वाची धुरा वाहिली. मात्र २००० सालानंतर राजकीय समीकरणे बदलत गेली. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर काँग्रेससमोर मोठे आव्हान निर्माण झाले. तर २०१४ नंतर भाजपने जोरदार मुसंडी मारली. २०२४ची विधानसभा निवडणूक भाजपने शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादीच्या सोबतीने लढवली. मात्र, केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी २०२९ ची निवडणूक स्वबळावर लढवण्याचे संकेत आधीच देऊन टाकले आहेत. त्याप्रमाणे भाजपकडून आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यात आली. ज्या मतदारसंघात भाजपचा आमदार नसेल, तिथे पक्षाचा उमेदवार तयार करायचा. त्यातूनच आपल्या पक्षाची ताकद वाढवायची, असा हा प्लॅन आहे. त्यानुसार भाजपकडून पावले टाकली जात आहेत.


अलीकडेच पुणे जिल्ह्यातील एक मोठे राजकीय घराणे भाजपच्या गळ्य़ाला लागले. ते म्हणजे भोरचे थोपटे घराणे होय. माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे नाव एकेकाळी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. काँग्रेसनिष्ठ म्हणून त्यांची ओळख होती. पण, पवारविरोधक थोपटेंना मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली. त्यांचे पुत्र संग्राम थोपटे यांचाही भोर वेल्हा पट्यात प्रभाव आहे. मागच्या निवडणुकीत त्यांचा अजितदादा गटाचे शंकर मांडेकर यांनी पराभव केला. असे असले, तरी थोपटे यांचे सर्वदूर मजबूत जाळे आहे. त्यांनी पक्षात प्रवेश केल्याने भाजपला या मतदारसंघात आपले अस्तित्व निर्माण करता येईल. धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे ते पुत्र आहेत. त्यांचा २०२४च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. भाजपच्याच उमेदवाराने त्यांना हरवले असले तरी त्यांचा जिल्ह्यावरचा प्रभाव बघून त्यांना पक्षात घेतले आहे. याशिवाय नाशिकमध्ये अंतर्गत विरोध असतानाही सुधाकर बडगुजर यांना भाजपमध्ये घेण्यात आले. राष्ट्रवादीचे माजी आमदार अपूर्व हिरे यांनाही भाजपमध्ये घेण्यात आले.


याशिवाय इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील हेदेखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेसचे माजी पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांचाही भाजपमध्ये वाजतगाजत पक्ष प्रवेश झाला. त्यांच्या पक्ष प्रवेशाने शिंदे गटाच्या विजय शिवतारे यांच्यापुढे मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. संजय जगताप हे पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विजय शिवतारे यांनी त्यांचा पराभव केला होता. निवडणूक निकालानंतर जगताप काँग्रेसमध्ये अस्वस्थ होते. अलीकडेच, सासवड आणि जेजुरी येथील काँग्रेसच्या काही माजी नगरसेवकांनी संजय जगताप यांची भेट घेऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची मागणी केली होती. कार्यकर्त्यांचा मोठा रेटा असल्याने जगताप भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.


पुरंदर तालुक्यात काँग्रेस पक्षावर माजी आमदार संजय जगताप यांच्या कुटुंबाची मजबूत पकड आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसची साथ सोडल्याने जिल्ह्यातून पक्ष जवळपास हद्दपार झाल्यात जमा आहे. संजय जगताप यांच्या भाजप प्रवेशामुळे पुरंदर तालुक्यात भाजपला मोठे राजकीय बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसची ‘महायुती' सत्तेत आहे. जगताप यांच्या प्रवेशामुळे येत्या काही महिन्यांत होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फायदा होऊ शकतो. अनेक वर्षांपासून पुरंदर तालुक्यात सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपला संजय जगताप यांच्या माध्यमातून एक मजबूत आधार मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.


बारामतीला वेढा अन् जिल्ह्यात सर्वपक्षीयांना शह


बारामती लोकसभा मतदारसंघात भोर-वेल्हा, खडकवासला, इंदापूर, बारामती, पुरंदर व दौंड अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. भाजपने या सर्वच्या सर्व मतदारसंघात आपला प्रभाव वाढवला आहे. काँग्रेसचे दोन बडे मोहरे टिपून भाजपने बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातदेखील भाजपने सर्वपक्षीयांना मोठा शह दिला आहे.


पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी देखील भाजपची वाट धरल्याने पुणे जिह्यात काँग्रेस पक्षाला आणखी एक धक्का बसला. एकेकाळी पुणे जिल्ह्यावर काँग्रेस पक्षाचे मोठे वर्चस्व होते. मात्र आता पक्षाला जिल्ह्यात गळती लागल्याचे दिसते. यातूनच भाजपाने २०२९ ची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याची तयारी सुरू केल्याचे मानले जात आहे. शिवाय या माध्यमातून बारामतीभोवतीचा वेढाही अधिक घट्ट करण्याची भाजपची रणनीती असल्याचेही दिसून येते.

- विशेष प्रतिनिधी

Comments
Add Comment

विदर्भात भाजपने फुंकले निवडणुकांचे रणशिंग

सेवाग्रामला झालेल्या या एकदिवसीय मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनाच मार्गदर्शन केले.

मराठवाड्यात भूमाफियांचा उच्छाद

मराठवाड्यात संपत्तीच्या खरेदी-विक्रीच्या प्रकरणात अनेक उलाढाली होतात. राज्याचे मंत्री यांच्याविषयी हॉटेल

भाजपमध्ये इनकमिंग जोरात; पण प्रकल्प अपूर्णच

नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत

पाचपट मोबदल्याने ‘शक्तिपीठ’ मार्गी लागणार!

विशेष प्रतिनिधी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तिपीठ

एक हजार आदिवासी विवाहबंधनात...!

संतोष वायंगणकर कोकणातील रायगड जिल्ह्यात आजही आदिवासी मोठ्या प्रमाणावर आहेत. रायगड जिल्ह्यातील आदिवासी

निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांच्या व्यथा

मुंबई.कॉम : अल्पेश म्हात्रे मागील लेखात आपण बेस्ट कर्मचाऱ्यांच्या व्यथा पाहिल्या. मात्र त्यांच्या कथाही खूप