Sunday, August 31, 2025

रशियामध्ये भीषण भूकंपानंतर अनेक देशांमध्ये अलर्ट!

रशियामध्ये भीषण भूकंपानंतर अनेक देशांमध्ये अलर्ट!

मॉस्को : रशियाच्या पूर्वेकडील कामचाटका द्वीपकल्पाच्या समुद्रकिनारी बुधवारी ८.८ रिश्टर स्केलचा भयंकर भूकंप झाला. १९५२ नंतरचा हा सर्वात शक्तिशाली भूकंप मानला जात असून, त्यानंतर रशिया, जपान, अमेरिका, फिलिपिन्स, इंडोनेशिया आणि चीनसह अनेक देशांत त्सुनामी अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू कामचाटका पासून १३३ किमी दूर समुद्रात होता. रशियातील सेवेरो-कुरील्स्क बंदरावर त्सुनामीच्या तीन लाटा आल्या, ज्यात तिसरी लाट अत्यंत जोरदार होती. परिणामी किनाऱ्यावरील शहरे पाण्याखाली गेली, जहाजे वाहून गेली आणि ३०० हून अधिक नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

हवायमध्ये १० फूट उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. डिज्नी रिसॉर्टसह अनेक हॉटेल्स रिकामे करण्यात आले असून पर्यटकांना शाळांमध्ये हलवण्यात आले. कॅलिफोर्निया, अलास्का आणि अमेरिकेच्या वेस्ट कोस्टवर समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जपानमध्ये किनाऱ्यालगतच्या नागरिकांना उंच भागांमध्ये हलवण्यात आले. फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पातून कर्मचारी बाहेर काढण्यात आले असून, कोणतीही गळती झाल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

भारतीय हवामान खात्याने भूकंपाचा भारतावर तात्काळ धोका नसल्याचं सांगितलं असलं, तरी परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे.

रशियाच्या काही भागांमध्ये वीज व मोबाईल सेवा खंडित झाली असून, अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या अणुऊर्जा देखरेख संस्थेने पॅसिफिक किनाऱ्यावरील अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे.

त्सुनामीचा धोका काही प्रमाणात ओसरल्याचे सांगितले जात असले तरी, जगभरातील समुद्रकिनारी देश सतर्क झाले आहेत.

Comments
Add Comment