Saturday, October 25, 2025
Happy Diwali

अमेरिकेतील मॅनहॅटनमध्ये गोळीबार; पोलिस अधिकाऱ्यासह चौघांचा मृत्यू, हल्लेखोर ठार

अमेरिकेतील मॅनहॅटनमध्ये गोळीबार; पोलिस अधिकाऱ्यासह चौघांचा मृत्यू, हल्लेखोर ठार

वॉशिंग्टन : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटनमध्ये एका सशस्त्र व्यक्तीने अंधाधुंध गोळीबार केला. या हिंसक हल्ल्यात पोलिस अधिकाऱ्यासह किमान चार जणांचा मृत्यू झाला. न्यूयॉर्क पोलिसांनी तत्काळ प्रत्युत्तर देत हल्लेखोराला ठार केलं असून, घटनेनंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.

गोळीबार पार्क अव्हेन्यू आणि ईस्ट ५१व्या स्ट्रीटच्या परिसरात झाला, जो न्यूयॉर्कच्या उच्च सुरक्षा क्षेत्रात मोडतो. या भागात कोलगेट-पामोलिव्ह, केपीएमजी यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालयं आणि पंचतारांकित हॉटेल्स आहेत. त्यामुळे अचानक सुरू झालेल्या गोळीबारामुळे प्रचंड घबराट निर्माण झाली.

न्यूयॉर्कचे महापौर एरिक अॅडम्स यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हल्ल्याच्या घटनेबाबत दु:ख व्यक्त करत मृत पोलिस अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. गोळीबार सुरू असताना त्यांनी नागरिकांना मिडटाऊन परिसर टाळण्याचे आवाहनही केले होते.

पोलिस विभागाने नंतर खात्रीपूर्वक सांगितले की, एकमेव हल्लेखोर ठार करण्यात आला असून, परिसर आता नियंत्रणात आहे. या गोळीबारामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र फेडरल तपास यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून तपास सुरू आहे.

या घटनेमुळे अमेरिकेतील बंदूकधारी हिंसाचाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. उच्च सुरक्षा असलेल्या मॅनहॅटनसारख्या भागात झालेल्या हल्ल्याने न्यूयॉर्कवासीयांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Comments
Add Comment