पुणे: पुण्यातील खराडी येथील रेव्हा पार्टी प्रकरणी एकनाथ खंडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यासह इतर सात आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. ही कोठडी आज संपली आहे. त्यामुळे आज या सर्व आरोपींना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यादरम्यान न्यायालयात रोहिणी खडसे यादेखील दिसल्या. आपल्या पतीला वाचवण्यासाठी रोहिणी खडसे यांनी अंगावर वकिलीचा कोट चढवलेला दिसून आला. सुनावणीदरम्यान, पुणे न्यायालयात त्या वकिलाचा कोट घालून हजर होत्या.
पतीसाठी वकील म्हणून रोहिणी खडसे न्यायालयात हजर
प्रांजल खेवलकर हे रोहिणी खडसे यांचे पती आहेत, आणि त्यामुळे त्यांच्या बाजूने रोहिणी खडसे आज न्यायालयात हजर होत्या. रोहिणी खडसे यांनी कायद्याचे शिक्षण घेतलेले आहे. त्या खुद्द एक वकील आहेत. त्यामुळे आपल्या पतीच्या सुटकेसाठी त्यादेखील प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रोहिणी खडसे आज न्यायालयात वकिलीचा कोट घालून हजर राहिल्या. न्यायालयात येण्याआधी रोहिणी खडसे यांनी खेवलकर यांच्यावर कोणकोणते गुन्हे दाखल करण्यात आले, याबाबत पोलिसांकडून माहिती घेतली. त्यानंतर रोहिणी खडसे थेट न्यायालयात वकीली पोषाखात उपस्थित राहिल्या. दरम्यान, प्रांजल खेवलकर यांच्या अटकेनंतर एकनाथ खडसे यांनी गंभीर आरोप केले आहेत. माझ्या जावयाला अडकवण्यात येत आहे, असा दावा खडसेंनी केला आहे.