
मुंबई : मुंबई शहरासाठी महत्त्वाचा असलेल्या व पूर्व उपनगरांशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या परळ टीटी उड्डाणपुलाच्या दुरुस्ती आणि बळकटीकरणासाठी महापालिकेने निर्णय घेतला आहे. पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या कामांसाठी अंदाजे १३ कोटी ८२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून कंत्राटदाराची निवडही करण्यात आली आहे. ही दुरुस्ती पावसाळ्यानंतर टप्प्याटप्याने केली जाणार आहे.
परळ टीटी उड्डाण पुलाला यंदा ३६ वर्षे पूर्ण झाली असून, २०२३ मध्ये डांबरी पृष्ठभाग खराब झाल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. त्यावेळी पुलाची केवळ तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. राज्य सरकारने महापालिकेला तातडीने दुरुस्तीचे निर्देश दिले होते. यानंतर महापालिकेने सप्टेंबर २०२४ मध्ये पुलाच्या संपूर्ण बळकटीकरणासाठी निविदा काढली होती. आता ती अंतिम करण्यात आली असून लवकरच पुलाचे काम सुरू होणार आहे.
दुरुस्तीचे काम करण्यासाठी उड्डाणपूल बंद केल्यास भायखळा, लालबाग, दादर, सायन आणि पूर्व उपनगरातील प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या सायन उड्डाणपूलही बंद असल्याने वाहतुकीची जबाबदारी परळ पुलावर आहे. म्हणून हे काम टप्प्याटप्याने करण्यात येणार आहे. या पुलामध्ये सध्या २२ प्रसरण सांधे आहेत. ते कमी करून १० पर्यंत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिक प्रसरण सांधे हे वाहतुकीसाठी त्रासदायक ठरत असल्याने, काँक्रिटीकरण करून पुलाच्या मजबुतीकरणासह रस्त्याच्या पृष्ठभागालाही नवसंजीवनी दिली जाणार आहे.