Saturday, August 2, 2025

'प्रलय'चा अचूक प्रहार! – भारताच्या बॅलिस्टिक शक्तीत दमदार भर!

'प्रलय'चा अचूक प्रहार! – भारताच्या बॅलिस्टिक शक्तीत दमदार भर!

'प्रलय' क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी


नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षेत्रात मोठं यश मिळालं असून, डीआरडीओने स्वदेशी बनावटीच्या ‘प्रलय’ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची सलग दोन दिवस यशस्वी चाचणी केली आहे. २८ आणि २९ जुलै २०२५ रोजी घेतलेल्या या चाचण्या लष्कराच्या गरजेनुसार करण्यात आल्या असून, अल्प आणि मध्यम पल्ल्याच्या अचूक माऱ्याची क्षमता तपासण्यासाठी या चाचण्या केल्या गेल्या.


दोन्ही दिवस क्षेपणास्त्राने अपेक्षेप्रमाणेच निश्चित दिशेने उड्डाण करत लक्ष्य अचूक भेदलं. डीआरडीओने स्पष्ट केलं की, या चाचण्यांमध्ये सर्व निर्धारित मानके आणि उद्दिष्टांची पूर्तता झाली आहे.



‘प्रलय’ हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे, जलद प्रतिसादक्षम आणि स्वदेशी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे कमी वेळेत डिप्लॉय होऊन, अचूकतेने आणि वेगाने शत्रूच्या लक्ष्यावर हल्ला करण्यास सक्षम आहे. या क्षेपणास्त्रामुळे भारतीय लष्कराच्या लहान पल्ल्याच्या माऱ्याची क्षमता आणखी वाढली असून, देशाच्या रक्षणसामर्थ्यात ठोस भर पडली आहे.


‘प्रलय’च्या यशस्वी चाचणीमुळे भारताची स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानातील ताकद अधोरेखित झाली असून, युद्धस्थितीत जलद प्रतिसाद देण्याची क्षमता आता अधिक प्रभावी झाली आहे.

Comments
Add Comment