‘दिव्या’ विजेती

  138

भारतात उदारीकरणाचे पर्व सुरू झाल्यानंतर सारे चित्र पालटले आणि महिलांची सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून भाग घेण्याची चढाओढ सुरू झाली. आता जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतही भारतीय महिलांनी आपला झेंडा उंचच ठेवला आहे. जॉर्जियातील बाटुमी येथे सुरू असलेल्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांच्यात पहिला डाव बरोबरीत सुटला; परंतु त्यानंतर टायब्रेकरमध्ये महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने कोनेरू हम्पीला नमवत विश्वचषकावर आपले नाव कोरले. भारतासाठी ही गौरवास्पद बाब आहे. अंतिम फेरीत भारताच्याच दोन्ही महिला एकमेकांसमोर होत्या. त्यामुळे कुणीही जिंकले असते तरी चषक भारताकडेच येणार होता. यावरून ही बाब स्पष्ट झाली की, भारतीय महिला क्रीडापटू आपला झेंडा उंचावण्यासाठी सदैव तत्पर असतात.


हा सामना ऐतिहासिक होता याचे कारण असे की, दोन्ही भारतीय महिला सुवर्ण आणि रौप्य चषकासाठी लढत होत्या. ही स्पर्धा २०२६ च्या फिडे बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्रता फेरीची लढत समजली जाईल. भारतीय महिलांसाठी हा क्षण ऐतिहासिक आहे, कारण या पूर्वी कोणत्याही महिलांनी बुद्धिबळ स्पर्धेत असे यश मिळवले नव्हते. कोनेरू हम्पी ही आंध्र प्रदेशची तर दिव्या देशमुख ही नागपूरची. दोघींनीही आपल्या अगोदरच्या सामन्यात अभूतपूर्व कामगिरी केली आहे. भारतीय महिलांचे कौतुक करत असतानाच एक बाब मात्र स्पष्टपणे जाणवते की, आमच्या महिलांनी सर्व क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी केली आहे. पुरुषांइतक्याच स्त्रिया क्रीडा विश्वातही अढळ स्थान निर्माण करू शकतात हे या दोघींनी दाखवून दिले आहे.


अर्थात महिला बुद्धिबळ विश्वात अजून खूप मागे आहेत. १९८० पासून त्या बुद्धिबळ क्रीडा विश्वात आहेत पण फार थोड्यांनी अव्वल बुद्धिबळ स्पर्धेतील विजेते म्हणून झेप घेतली आहे. भारतात महिलांप्रती असलेली एकप्रकारे तुच्छ भावना सर्व खेळांमध्ये आहे. त्यात क्रिकेटमध्ये तर जास्तच आहे. पण आता महिला क्रिकेट खूप लोकप्रिय झाले आहे. बुद्धिबळ स्पर्धा पाहण्यासाठी जॉर्जिया येथे काल भरपूर प्रेक्षक जमले होते आणि ते दिव्या आणि कोनेरू हम्पी यांना चिअरअप करत होते. हे खूप आश्वासक चित्र आहे. एक काळ असा होता की, महिला या बुद्धिबळ स्पर्धा खेळण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम नाहीत असे समजले जात होते. आज अशी परिस्थिती राहिली नाही आणि ऑलिम्पिक असो की बुद्धिबळ असो, सर्वच क्षेत्रातील पुरुषांची मक्तेदारी मोडून काढण्यात महिला यशस्वी झाल्या आहेत. या सामन्यात कोण जिंकले किंवा कोण हरले हे महत्त्वाचे नाही. महत्त्वाचे आहे की, महिलांनी जबरदस्त झेप घेतली आहे आणि तिचे ऐतिहासिक महत्त्व आहे. या स्पर्धेतून ५० हजार अमेरिकन डॉलर भारतात येणार आहेत. त्यामुळे मिळणारे मानधनही महिलांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. काही भारतीयांचे मत असे आहे की, अशा स्पर्धा तरुण मुलींना नवनवीन क्षेत्रे पादाक्रांत करण्यासाठी प्रेरणा देतील. महिला गट आणि पुरुष गट स्पर्धेतील येणारा पैसा यात खूप फरक असतो. क्रिकेटमध्ये तर पुरुषांच्या स्पर्धांच्या तुलनेत महिलांना मिळणारे मानधन यातील तफावत पाहिली तर डोके चक्रावून जाते. पण बुद्धिबळ स्पर्धेत एवढी रक्कम येणार आहे हे पाहून अनेक महिला बुद्धिबळ खेळाकडे आकर्षित होतील. दिव्याच्या या अविस्मरणीय विजयामुळे भारतीय महिलांची बुद्धिबळासाठीची क्रेझ आणखी वाढेल यात शंका नाही.


भारतात अजूनही ग्रँडमास्टर्स फार कमी आहेत. २०२३ च्या आकडेवारीनुसार फक्त २३ महिला ग्रँडमास्टर्स होत्या. अनेक सनातनी आई-वडील आपल्या मुलींना बुद्धिबळाकडे वळू देण्यास नाखूश असतात. ही एक अडचण आहे. तरीही या सर्व परिस्थितीवर मात करून फिडे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतील विजेतेपद भारतातील महिलांचे सहभागाचे चित्र बदलेल अशी आशा वाटते. पाच वेळा विश्वविजेता झालेला विश्वनाथन आनंद म्हणाला की, दिव्या देशमुख हिने फार मोठी प्रगतीची झेप घेतली आहे. ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांच्या मतानुसार, दिव्या कधीही नवीन प्रयोग करण्यास घाबरली नाही. दिव्यासाठी ही एक जबरदस्त मोहीम होती, कारण महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी ती पहिली होती. ३८ वर्षीय कोनेरू ह्म्पीच्या निम्म्या वयाच्या दिव्याने घेतलेली झेप अनेकांना प्रेरणादायक आहे. दिव्या आणि हम्पी यांच्यातील हा सामना असंख्य किशोरवयीन तरुणींसाठी प्रेरणादायक ठरेल आणि दिव्याच्या म्हणण्यानुसार सोप्या पद्धतीने विजय मिळवण्यात काय अर्थ असतो, विजय मिळवला पाहिजे तो तगड्या प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवून. तिच्या या मानसिकतेमुळेच आज तिने चिवट लढतीनंतर विश्वचषकावर नाव कोरले आहे. ती अत्यंत सकारात्मक पद्धतीने खेळते आणि बुद्धिबळाकडे पाहण्याचा हाच दृष्टिकोन महत्त्वाचा असतो आणि तो दिव्याला इतर खेळाडूंपेक्षा वेगळा करतो. दिव्या आधीच ‘कँडिडेट्स टूर्नामेंटसाठी पात्र ठरली आहे, जे बुद्धिबळ विश्वविजेतेपदाच्या वाटचालीतलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. दिव्या देशमुख आता केवळ वर्ल्डकप विजेतीच नाही, तर तिने या ऐतिहासिक विजयासोबत ग्रँडमास्टरचा मानही मिळवला आहे. दिव्याने अनुभवी आणि उच्च मानांकन असलेल्या कोनेरू हम्पीचा पराभव करत हे प्रतिष्ठेचे विजेतेपद आपल्या नावे केले. असे विजेतेपद पटकवणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली आहे.

Comments
Add Comment

बोटावर निभावलं!

‘जीवावर बेतलेलं अखेर बोटावर निभावलं' म्हणून राज्याचे नूतन क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी गुरुवारी रात्री

अजेंडा फसला!

‘दहशतवादाला कुठलाही धर्म नाही, कुठलाही रंग नाही', अशी टिप्पणी करत मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी राष्ट्रीय तपास

‘लाडक्यां’चा घोटाळा

राज्यात लोकप्रिय आणि गेमचेंजर ठरलेली ‘लाडकी बहीण योजना’ सध्या एनकेन कारणाने वादात आहे. ही सरकारी योजना केवळ

माँ तुझे सलाम...

पहलगाम या काश्मिरातील निसर्गरम्य स्थळी भारतातील पर्यटक फिरायला गेले असताना कसलाही अपराध नसताना त्यांचे शिरकाण

शाळांच्या इमारतींचा धोका

बालकांना कळत्या वयापासूनच शालेय जीवनाशी समरस व्हावे लागते. एकेकाळी उजवा हात डाव्या कानाला लागल्याशिवाय

मोदीयुग

हिंदू पुराणांत चार युगांची कल्पना सांगितली आहे. चार युगांच्या चक्राकार गतीने विश्व बांधलेलं आहे, असं त्यात