Sunday, August 24, 2025

'आई तुळजाभवानी' मालिकेत दैवी लीला! मोहिनीच्या 'मायावी' अंताचा थरार

'आई तुळजाभवानी' मालिकेत दैवी लीला! मोहिनीच्या 'मायावी' अंताचा थरार

मुंबई : कलर्स मराठीवरील प्रेक्षकांची लाडकी मालिका 'आई तुळजाभवानी' आता एका अत्यंत थरारक आणि भावनिक टप्प्यावर पोहोचली आहे. 'आई कोण?' या मूलभूत प्रश्नाभोवती फिरणाऱ्या कथानकात, षड्रिपू मोहसारख्या स्त्रीरूपाचे अभेद्य मायाजाल आणि यावर देवी तुळजाभवानीचा न भूतो न भविष्यती असा दैवी हस्तक्षेप प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. हा विशेष भाग नेत्रदीपक ग्राफिक्सची पर्वणी ठरणार आहे.

या विशेष भागात, जगदंबा मिळणार या आनंदात मोह गावात उभी असते. ती कुटिल हसत म्हणते, "तुला आता माझ्यापासून कुणीच वाचवू शकणार नाही… कारण सौंदर्याच्या जाळ्यात कुणालाही अडकवून, मी हवं तसं खेळवू शकते आणि मला जे हवे ते मिळवू शकते." मात्र, त्याच क्षणी छोटी जगदंबा तिच्यासमोर उभी ठाकते. पाहता पाहता पाच-सहा 'जगदंबा' तिच्या आजूबाजूला वर्तुळाकार उभ्या राहतात. "हे काय चाललंय? सगळीकडे जगदंबाच?" असे म्हणत मोह घाबरते. मग एक एक जगदंबा कवड्यांमध्ये रूपांतरित होते, आणि त्या अनेक कवड्यांमधून तेजस्वी तुळजाभवानी देवी प्रकट होते.

हे रूप पाहून मोह अजूनच अस्थिर होते. पण त्या तेजस्वी कवड्या तिच्यावर झेप घेतात. मोह धडपडते. तिचं रूप विद्रूप होतं... चेहऱ्यावर जखमा आणि खड्डे पडतात. त्या कवडीपैकी एक आरशात बदलते. मोह तिथे स्वतःचं विद्रूप रूप पाहते आणि जीवाच्या भीतीने किंचाळते.

तुळजाभवानी मोहरूपी मोहिनीला बजावते, "फक्त रूप असून चालत नाही… तेज हवं जे आतून येतं… आणि अंधार नष्ट करतं!" आता आई तुळजाभवानी मोहरूपी मोहिनीचा विनाश कशी करणार? तिच्या पापांचा हिशोब कसा चुकता करणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.

तेव्हा नक्की बघा कशी 'आई तुळजाभवानी'ची दैवी लीला घडणार, आणि कसा मोहिनीचा 'मायावी' अंत होणार. 'आई तुळजाभवानी' मालिकेत दररोज रात्री ९ वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.

Comments
Add Comment