
अनधिकृत फलकांवर कारवाईची मागणी
कर्वेनगर : वारजे-कर्वेनगर परिसरात मुख्य रस्त्यावर वारजे उड्डाणपूल येथे विद्युत रोहित्र, विद्युत खांब, लोखंडी सळ्या, मोठ्या प्रमाणात लाकडी बांबू विखुरले आहेत. त्यामुळे हा परिसर येणाऱ्या- जाणाऱ्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. हे साहित्य तत्काळ हटवा अशी मागणी नागरिक करत आहेत.
पावसाळ्यात उघड्या तारांना स्पर्श होऊन एखादा गंभीर अपघात होऊ शकतो. वारा, पावसात हे बांबूचे डोंगर कोसळून अपघात घडू शकतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पादचारी, वाहनधारक आणि स्थानिकांची ये-जा असते. सहाय्यक आयुक्त दीपक राऊत, यांनी सांगितले की, अनधिकृत फलकांवर कारवाई करताना लाकडी डोंगरांवर पण कारवाई होत आहे. यापुढे लाकडी डोंगर जप्तीची कारवाई सातत्याने करण्यात येणार आहे.
फलकांचे साहित्य पडीक
गल्लीतील कार्यकर्त्याचा वाढदिवस असो किंवा एखादा कार्यक्रम वा सण हल्ली नाक्यावर दाटीवाटीने फलक लावले जातात. ते लावण्यासाठी लाकडी बाबूंचे डोंगर उभे केले जातात. कार्यक्रम झाला तरी ते फलक तेथेच पडून राहतात. हे फलक पुणे महानगरपालिकेसाठी डोकेदुखी ठरत आहे. ते तात्काळ काढण्याची मागणी होत आहे. तसेच, मांडव टाकणाऱ्याचे साहित्य जप्त करून कायदेशीर कारवाईची करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.