
मिळालेल्या माहितीनुसार, गोड्डा- देवघर राष्ट्रीय महामार्गावर, मोहनपूर पोलिस स्टेशन हद्दीतील परिसरात एका ट्रकने कावडिया यात्रेकरूंनी भरलेल्या बसला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, बसचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले, मात्र तोपर्यंत १८ यात्रेकरूंचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. श्रावण महिन्यात देवघर येथे बाबा बैद्यनाथ धाम येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने कावड यात्रेकरू येतात. हा अपघात अशा वेळी झाला आहे, जेव्हा कावड यात्रेकरूंची मोठी गर्दी असते.
या घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून, कावड यात्रेकरूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून, मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर करण्याची शक्यता आहे.