
पुणे: रेव्ह पार्टीत (Pune Rave Party) पती प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर पत्नी रोहिणी खडसे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. प्रांजल खेवलकर एकनाथ खडसे यांचा जावई आणि रोहिणी खडसेचे पती असून, पुण्यातील एका रेव्ह पार्टीत टाकलेल्या धाडीत त्यांना अटक करण्यात आली आहे. ज्यामुळे खडसे बापलेकीची मोठी राजकीय कोंडी झाली आहे. सदर घटना राजकीय षडयंत्र असल्याचं बोललं जात आहे, तसेच या संबंधित वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील बाहेर पडत असल्या तरी, आतापर्यंत रोहिणी खडसे यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर, पतीच्या अटकेनंतर दोन दिवसांनी त्यांनी आपले मौन सोडले आहे.
पती प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांना अटक केल्यानंतर रोहिणी खडसे यांनी एक्सवर पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल, असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी प्रांजल खेवलकरसह सातही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल !
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) July 28, 2025
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/9wMcarRLow
२५ जुलैला देखील पार्टी, पोलिसांचा दावा-
पुणे पोलिसांनी छापा टाकून एकानाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना पार्टी करताना २७ जुलै रोजी पहाटे अटक केली.या पार्टीत अमंली पदार्थ सापडल्याचा पुणे पोलीसांचा आरोप आहे. २६ जुलै रात्री पुण्यातील खराडी भागातील एका फ्लॅटवर ही पार्टी सुरु झाली होती. मात्र पोलीसांच्या मते अशीच पार्टी 25 जुलैला देखील झाली होती असा पोलिसांचा दावा आहे. प्रांजल खेवलकर यांनी चार दिवसांसाठी तो फ्लॅट बुक केला होता. त्यामुळे पुणे पोलीस शुक्रवारी 25 जुलैला झालेल्या पार्टीची देखील चौकशी करणार आहेत. त्यासाठी ज्या फ्लॅटमधे पार्टी झाली तिथले सी सी टी व्ही फुटेज देखील तपासले जाणार आहेत.
एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया
रेव्ह पार्टी प्रकरणात जावई प्रांजल खेवलकरला रंगेहाथ पकडल्यानंतर एकनाथ खडसे यांच्यावर चौफेर टीका झाली. या दरम्यान एकनाथ खडसे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. "गेल्या काही दिवसात जे वातावरण सुरू आहे, त्यानुसार असं काही घडू शकते याचा अंदाज मला येत होता. पुण्यात घटना घडली असे सांगितले जात आहे. मी हे मीडियातूनच पाहिले आहे. माझं अजून प्रत्यक्षात त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. कारण ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. जर ती खरी रेव्ह पार्टी असेल आणि त्या रेव्ह पार्टीत आमचे जावई गुन्हेगार असतील तर मी त्याचं समर्थन करणार नाही. पण पोलीस यंत्रणेने प्रामाणिकपणे तपास करावा, अशी आमची अपेक्षा आहे. जावई असो किंवा अन्य कुणी असो जर दोषी असेल तर शासन झाले पाहिजे. पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न करणार असाल तर ते सहन केले जाणार नाही. त्याचा निश्चितपणे आम्ही विरोध करू, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.