Monday, August 18, 2025

पहलगामचा सूत्रधार हाशिम मुसा ठार

पहलगामचा सूत्रधार हाशिम मुसा ठार

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर येथे सुरक्षा पथकांनी ऑपरेशन महादेव अंतर्गत पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड शाह सुलेमान उर्फ हाशिम मुसा याला ठार केले. हाशिम मुसा व्यतिरिक्त अबू हमजा आणि मोहम्मद यासिर या दोन दहशतवाद्यांनाही सुरक्षा पथकाने ठार केले. श्रीनगरमधील दाचीगाम राष्ट्रीय उद्यानाजवळील हरवान भागात झालेल्या चकमकीत हाशिम मुसासह एकूण तीन दहशतवादी ठार झाले.



हाशिम मुसा हा दहशतवादी म्हणून भारतात घुसला होता. त्याच्याच नेतृत्वात दहशतवाद्यांनी पहलगाम येथे हल्ला करुन २२ एप्रिल २०२५ रोजी २६ नागरिकांची हत्या केली. धर्म विचारून नागरिकांची हत्या करण्यात आली होती. मृतांमध्ये एक नेपाळी नागरिक पण होता.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी म्हणून सक्रीय होण्याआधी हाशिम मुसा पाकिस्तानच्या सैन्यात पॅरा कमांडो होता. तो जेसीओ किंवा हवालदार या पदावर पाकिस्तानच्या सैन्यात काम करत होता. यामुळे पहलगामच्या हल्ल्यामागे पाकिस्तानच्या सैन्याचा हात होता, याचा मोठा पुरावाच भारताच्या हाती आला आहे.


गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीआधारे मागील काही दिवसांपासून सुरक्षा पथकाचे सदस्य पाळत ठेवून होते. अखेर पहिल्या श्रावण सोमवारी म्हणजेच २८ जुलै २०२५ रोजी सुरक्षा पथकाने घेराव घालून हाशिम मुसाला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा पथकावर गोळीबार केला. या गोळीबाराला सुरक्षा पथकाने तातडीने प्रत्युत्तर दिले. सुरक्षा पथकाच्या ठोस कारवाईत पहलगामचा सूत्रधार हाशिम मुसा ठार झाला.


भारताने ऑपरेशन सिंदूर करुन पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले. ही कारवाई केल्यामुळे देशभरातून भारतीय सैन्याचे कौतुक होत होते. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले तरी पहलगाम येथे नागरिकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा प्रश्न अनुत्तरित होता. आज पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधारच ठार झालेला यामुळे दहशतवादी विरोधी भारताच्या कारवाईला आणखी मोठे यश मिळाले आहे.


Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा