नागपूरच्या कन्येने पटकावले महिला विश्वचषक विजेतेपद
ग्रँडमास्टर होणारी भारताची चौथी महिला
२४ दिवस बुद्धिबळात विश्वविजेतेपदाची निकराची झुंज देत, महाराष्ट्राच्या कन्येने नवीन ग्रँड मास्टर होण्याचा किताब आपल्या नावे केला. नागपूरची असलेल्या दिव्या देशमुखने जॉर्जियाच्या बटुमी येथे झालेल्या विश्वचषक अंतिम सामन्यात भरताच्याच अनुभवी कोनेरू हम्पीला टायब्रेकद्वारे पराभूत करत, FIDE महिला विश्वचषक विजेतेपदावर आपले नाव कोरले. या विजयाबरोबरच ती ग्रँडमास्टर बनणारी भारताची चौथी महिला ठरली आहे.
१९ वर्षीय दिव्या ही अनुभवी प्रतिस्पर्धी हम्पीच्या निम्म्या वयाची होती, तसेच, इतक्या कमी वयात ग्रँडमास्टर बनणारी दिव्या हि भारताची पहिली महिला बुद्धिबळपटू ठरली आहे.
दिव्या देशमुखने कोनेरू हम्पीला कसे हरवले?
हम्पी आणि दिव्या यांच्यातील पहिले दोन क्लासिकल गेम अनिर्णित राहिले होते. शनिवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या गेममध्ये दिव्याला पांढऱ्या सोंगट्यांसह खेळताना जिंकण्याची सर्वोत्तम संधी होती. अनुभवी आणि वयाने खूप मोठ्या असलेल्या प्रतिस्पर्धी हम्पीला नमवण्यासाठी ती एक योजना घेऊन आली होती, ज्याचा तिला बोर्डवर फायदा झाला.
दिव्याने वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले की, सामन्यादरम्यानचा ड्रॉ तिला सुरुवातीला निराश करून गेला. मात्र त्यानंतर दिव्याने आक्रमक खेळी केली. दिव्याच्या चालीने अनुभवी हम्पीला गोंधळात टाकले. हम्पीने देखील दिव्याच्या खेळीचे कौतुक करताना हे मान्य केले. तिने सांगितले कि, "१२ चालींनंतर दिव्या पूर्णपणे क्लिअर झाली होती. त्या चालीनंतर, पुढे काय घडणार, किंवा काय चालले होते याची मला खात्री नव्हती, मी पूर्ण गोंधळले होते,"
आंतरराष्ट्रीय मास्टर असलेल्या दिव्याला सुरुवातीच्या टायब्रेकमध्ये कमी लेखण्यात आले होते. याचे कारण म्हणजे हे सामने रॅपिड फॉरमॅटमध्ये खेळले जात होते. तर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हम्पी तिच्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा वर्ल्ड रॅपिड चॅम्पियन बनली. हम्पी सध्या महिलांसाठी FIDE रेटिंग यादीत जगात पाचव्या क्रमांकावर आहे तर दिव्या जागतिक क्रमवारीत १८ व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे वर्ल्ड रॅपिड चॅम्पियन ठरलेल्या दिग्गज प्रतिस्पर्धीला हरवत महाराष्ट्राच्या कन्येने मिळवलेला विजय हा वाखाणण्याजोगाच म्हणावा लागेल.