भिवंडी: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात एक भीषण अपघात रविवारी रात्री घडला. ट्रकने एका टू व्हीलरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात २८ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाला. संकेत पांडुरंग पाटील असं या तरूणाचे नाव आहे.
संकेत कामानिमित्त भिवंडीच्या दिशेने जात होते. यावेळी समोरून एक भरधाव ट्रक त्याच्याच दिशेने आला. या ट्रकने संकेतच्या टू व्हीलरला जोरदार धडक दिली. यामुळे तो रस्त्यावर फरफटत गेला आणि ट्रक त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात तलवली नाका परिसरात घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या दुर्देवी घटनेनंतर संकेतला तातडीने नजीकच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, या अपघातातील ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.