कशाला उद्याची बात?

  28

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर


रामदासी संप्रदायातील एक महंत यात्रेला जात असताना एके दिवशी त्यांचा मुक्काम एका गावात होता. त्या गावातल्या सावकाराला ही बातमी समजली. सावकार अशा प्रकारच्या साधुसंतांचा आदर करणारा होता. धर्मात्मा म्हणून त्याची ख्याती होती.


रामदासी महंत आपल्या गावात आले आहेत, हे कळताच त्या सावकाराने देवळाकडे धाव घेतली आणि मोठ्या आग्रहाने त्यांना आपल्या वाड्यावर घेऊन आला. त्या महंतांचा यथायोग्य आदरसत्कार केला आणि अत्यंत नम्रतेने त्यांची सेवा केली. आपलं सारं वैभव त्यांना दाखवलं आणि म्हणाला, ‘महाराज, ही सगळी त्या परमेश्वराची कृपा. त्याच्या कृपेनं आज माझ्याजवळ सारं काही आहे. पैसाअडका आहे, दोन मुलगे आहेत. एक मुलगी, तिचं लग्न लावून दिलंय, आता ती तिच्या पतीबरोबर सुखानं संसार करतेय. सुना, नातवंडं आहेत. सुदैवानं सर्वांचं आरोग्यदेखील उत्तम आहे. ही सारी त्या परमेश्वराची कृपा असं मी मानतो. आता आपल्यासारख्या सत्पुरुषाचे पाय या घराला लागले, मी धन्य झालो. आपण आता मला आशीर्वाद द्यावा.’


‘तसं नाही महाराज. परमेश्वरानं आज सारं काही दिलंय. मी हयात असेपर्यंत पुरेशी संपत्ती शिल्लक आहे. पण... ‘पण काय?’ मी माझ्या हयातीपुरतं पुरेसं मिळवलंय. पण मुलाबाळांसाठी काही मागं ठेवायला नको का?’ ‘अहो, तुम्ही मुलाबाळांसाठीसुद्धा भरपूर करून ठेवलंय की... हा मोठा वाडा, शेती, जमीनजुमला, सोनंनाणं... आणखी काय पाहिजे?’


‘तरीदेखील काळजी वाटते हो. आज उत्पन्न आहे म्हणून ठीक. उद्या उत्पन्न बंद झालं आणि बसून खायची पाळी आली तर... नुसत्या कल्पनेनंच माझी झोप उडते. काय सांगू महाराज, अलीकडे मला शांत झोपदेखील लागत नाही. आजचा दिवस गेला. पण उद्याचा? माझी झोपच उडालेय महाराज.’


‘उद्याची चिंता आज कशाला करताय?’ ‘नाही कसं? उलट आजच्यापेक्षा उद्याचीच काळजी अधिक करायला हवी. आजच्या दिवसाबद्दल थोडा तरी अंदाज बांधता येतो; उद्या तर नेहमीच अनिश्चित. त्यामुळं उद्याचीच काळजी अधिक करायला हवी. जे उद्याची काळजी आज घेत नाहीत त्यांना...’ रामदासीबुवा हसले. ‘काय झालं महाराज, हसलात का? माझं काही चुकलं का?’‘नाही नाही. तुम्ही बोला. काय आशीर्वाद हवाय तो मागा. रामाच्या कृपेनं तो फलद्रूप होईल.’ ‘महाराज, मला आजची चिंता नाही, पण उद्याची काळजी वाटते. पुढच्या पिढ्यांसाठी काहीतरी भरपूर करून ठेवता यावं अशी माझी इच्छा आहे.’


‘किती पिढ्यांसाठी करून ठेवावं असं तुम्हांला वाटतं?’‘सात. किमान सात पिढ्यांसाठी तरी महाराज. त्यासाठी आपण आशीर्वाद द्यावा.’ सावकाराच्या चेहऱ्यावर लाचारी आणि भक्ती यांचं चमत्कारिक मिश्रण स्पष्ट दिसत होतं.


रामदासीबुवा हसले नि म्हणाले, ‘ठीक आहे. मी रामाजवळ तशी प्रार्थना करतो आणि आपल्या सात पिढ्यांना पुरेल एवढी संपत्ती आपल्याला मिळो असा आशीर्वाद देतो.’ आशीर्वाद ऐकून सावकार हरखून गेला. त्यानं महंतांच्या चरणांवर दंडवत घातला. बुवांनी त्याला उठवलं आणि थेट त्या सावकाराच्या डोळ्यांत पाहून म्हणाले, ‘हा आशीर्वाद नक्कीच फलद्रूप होईल. पण...’


‘पण काय महाराज ?’ सावकाराच्या चेहऱ्यावर चिंतेचं सावट पडलं... ‘त्यासाठी तुम्हाला एक छोटंसं दान करावं लागेल.’‘कसलं दान महाराज?’ ‘एक शेर धान्य दान द्यावं लागेल.’‘हात्तीच्या ! एवढंच ना, आत्ता देतो. एक शेर कशाला पाच शेर धान्य देतो...’ असं म्हणून सावकारानं गहू, तांदूळ, डाळ, ज्वारी, हरत-हेची कडधान्यं आणली. त्या महंतांसमोर ठेवून तो म्हणाला, ‘घ्या महाराज...’‘छे ! छे ! हे धान्य मला नको.’ ‘मग?’


शेजारच्या गावात बाबू नावाचा एक लोहार राहतो. तो आणि त्याची बायको दोघंच जण राहतात. रामाच्या देवळाशेजारी बाबू लोहाराची लहानशी झोपडी आहे. त्या जोडप्याला एकच मुलगा. तो शहरात शिकतोय. त्याच्या शिक्षणासाठी इथून पैसे धाडावे लागतात. त्यामुळं अनेकदा त्या जोडप्याला दिवसातून एकच वेळ अन्न खाऊन गुजराण करावी लागते. पती-पत्नी दोघं लोहारकाम करतात. ज्या दिवशी काम नसेल त्या दिवशी कुणाच्या तरी शेतात राबतात. दिवसभर घाम गाळतात. मोलमजुरी करतात. अनेकदा तर संध्याकाळी काय शिजवावं हा मोठा प्रश्न त्यांना भेडसावतो. त्या कुटुंबाला तू हे सारं धान्य नेऊन दे.’


झालं. सावकार ताबडतोब निघाला. गावाबाहेर पोहोचला. संध्याकाळ झाली होती. रामदासीबुवांनी सांगितलेली बाबू लोहाराची ती झोपडी त्यानं शोधून काढली आणि आणलेलं सारं धान्य त्या जोडप्यासमोर ठेवलं.


‘हे काय? धान्य कशासाठी?’ त्या लोहारानं प्रश्न केला. सावकारानं आपण त्या महंतांच्या आदेशानुसार हे धान्य घेऊन आल्याचं सांगून ते धान्य त्या लोहाराच्या हवाली केलं. पण तो लोहार ते धान्य घ्यायला तयारच होईना.


सावकार आग्रह करू लागला. ‘ठेवा हो... महंतांनी मला तुमची सारी परिस्थिती सांगितली आहे. तुम्हाला हे धान्य उपयोगी पडेल म्हणून त्यांच्या आज्ञेने मी इथं आलोय. हे धान्य स्वीकारा आणि आता स्वयंपाकाची तयारी करा.’‘पण आज रात्रीच्या स्वयंपाकापुरतं धान्य आहे घरात.’ त्या लोहाराची बायको म्हणाली.


‘आज संध्याकाळपुरतं आहे, पण उद्याचं काय? उद्यासाठी हे धान्य उपयोगी पडेल.’‘उद्याचं उद्या. देवाच्या दयेनं आजचा दिवस सुखात गेला. आज पोटाला हवं तेवढं त्यानं दिलं. उद्यासुद्धा तोच देणार. उद्याची काळजी आत्तापासून कशाला?’ सावकार काय समजायचे ते समजला आणि खजील होऊन माघारी परतला. हातावर पोट असणारा तो लोहार उद्याची चिंता न करता आनंदात राहतो आणि आपण मात्र, सगळं व्यवस्थित असूनदेखील आपण उद्याची चिंता करतो, सात पिढ्यांसाठी पुरेल एवढी संपत्ती आपल्याजवळ नाही म्हणून कष्टी होतो, याची त्या सावकाराला लाज वाटली.


या गोष्टीतला सावकार आपल्या प्रत्येकाच्या मनात थोड्याफार प्रमाणात का होईना दडलेला असतोच. आजचा दिवस बरा गेला, पण उद्याचा दिवस कसा येईल कोण जाणे, या विचारानं आपल्या आजच्या उत्पन्नापैकी काही थोडासा वाटा शिल्लक टाकणारे आपले मध्यमवर्गीय संस्कार. अर्थातच त्यात काही वाईट आहे असं अजिबात नाही. मिळालेला सगळा पैसा आज उडवून उद्या कफल्लक होण्यापेक्षा आज आहे त्यात थोडी काटकसर करून उद्यासाठी बेगमी केली, तर ते
हितावहच आहे.


पशुपक्षीदेखील अशाप्रकारे बेगमी करताना आपल्याला आढळतात. मुंग्या पावसाळ्यासाठी धान्य साठवतात. पक्षी सुगीच्या दिवसात दाणे जमा करून हिवाळ्याची तरतूद करतात. उंट ज्यावेळी मिळेल त्यावेळी पाणी पिऊन घेतो आणि पुढे वाळवंटात कित्येक दिवस पाण्याअभावी तग धरून राहतो. पशुपक्षी जर अशाप्रकारे उद्याची काळजी करतात, तर प्रगत मनुष्याने आपल्या उद्याची काळजी केली तर त्यात काही आश्चर्य नाही. पण अनेकदा ही ‘उद्या’ची काळजी करता करता ‘आज’ संपून जातो. उद्यासाठी शिल्लक टाकायची म्हणून आज उपासमार करून, अर्धपोटी राहून लोक पै-पै करून पैसा साठवतात. आज काहीही खर्च न करता शिल्लक टाकायची. कशासाठी? उद्यासाठी. ‘उद्याचा दिवस’ उजाडतो तो त्यावेळी त्या दिवसासाठी ‘आजच’ असतो. त्या आजला पुन्हा उद्याची काळजी. हा ‘आज’ कधीच संपत नाही आणि उद्या कधीच उजाडत नाही.


एक सत्यघटना सांगतो. कोकणात कुडाळ स्थानकाजवळ एक तरुण भिकारी बेवारशी मेला. त्याच्या प्रेताचा पंचनामा करताना पोलिसांना त्याच्या उशाजवळच्या गाठोड्यात काही नोटा सापडल्या. पोलिसांनी ते पैसे मोजले. तेव्हा ती रक्कम ऐंशी हजार रुपयांहून अधिक भरली. त्या भिकाऱ्याच्या शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये असा निष्कर्ष निघाला की, तो अनेक दिवसांपासून उपाशी होता. तो भिकारी भुकेनं मेला...


उशाजवळ पैशांचा ढीग घेऊन झोपणारा तो भिकारी. त्याला काय एक वडापाव किंवा मिसळपाव विकत घेऊन खाता आला नसता का? पण नाही. जवळचा पैसा खर्च करण्याची वृत्ती नाही. पोलिसांनी चौकशी केली, त्यावेळी समजलं की त्या भिकाऱ्याला म्हणे लग्न करायचं होतं, पण त्यापूर्वी त्याला एक झोपडी विकत घ्यायची होती. त्या झोपडीसाठी तो पै-पै करून रक्कम जमा करत होता. न खाता, न पिता, सगळा पैसा शिल्लक ठेवत होता. भिकाऱ्याची ही ‘काटकसर’ म्हणायची की कद्रूपणा?


काटकसर आणि कद्रूपणा यातील सीमारेषा अगदी पुसट असते. अनेकदा तर असंही होतं की आपण करतो ती ‘काटकसर’ आणि दुसरा करतो ती ‘कंजुषी’ अशी आपल्या सोयीनुसार व्याख्या केली जाते. पण मला वाटतं की आजचा दिवस चांगला गेला तरच उद्याचा दिवस चांगला जाईल. म्हणूनच प्रत्येकानं स्वतःच्या वैयक्तिक मर्यादा सांभाळून आजची काळजी घ्यायलाच हवी. अर्थातच आजच्या मिळकतीतून खर्च करताना उद्या कर्जबाजारी होणार नाही ना याची जाणीव प्रत्येकानं ठेवायलाच हवी. प्रत्येकानं अंथरुण पाहूनच हातपाय पसरावेत, पण अंथरुण असूनही ते उद्यासाठी ठेवून आज कुडकुडत झोपू नये. ऋण काढून सण साजरे करू नयेत. पण म्हणून सणच साजरे करायचे नाहीत हा अट्टहास नसावा. आपल्या ऐपतीला झेपतील एवढ्या प्रमाणात सण साजरे करून जीवनातला आनंद उपभोगायलाच हवा.


उतारवयासाठी, पुढे अचानक अडचणी आल्या तर त्यांना तोंड देण्यासाठी, मुलाबाळांसाठी काटकसर करणं यात काहीच गैर नाही पण... आपल्या पश्चात आपल्या मुलांसाठी त्यांच्या मुलांसाठी. आणखी पाचशे वर्षांनंतर काय होईल याची चिंता करीत आजचा हातातला क्षण दरिद्रीपणानं मारू नये हेच खरं.

Comments
Add Comment

रांगोळीचे किमयागार

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर गुणवंत मांजरेकर म्हणजे रांगोळीचे विद्यापीठ! अस्सल स्पष्टवक्ता मालवणी माणूस...! वरून कडक

बोल, बोल, बोल, जागेवाले की जय...

साक्षी माने  येत्या १६ ऑगस्टला देशभरात दहीहंडी उत्सव साजरा होईल, तेव्हा शहरातील सर्वात मोठी दहीहंडी फोडण्याचा

भांडण - बालपणाचे विरजण!

ओंजळ : पल्लवी अष्टेकर घर हे माणसाचे पहिले शिक्षणस्थान असते. घरात मिळालेला स्नेह, विश्वास, संवाद आणि प्रेमाची भाषा

गौरवशाली भारतीय शिल्पकला

विशेष : लता गुठे बदलत्या काळाबरोबर समाज बदलत असतो. त्याबरोबरच संस्कृती बदलते आणि संस्कृती बदलल्यामुळे समाजातील

“दिल मिले या न मिले...”

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे ताराचंद बडजात्यांचा १९६४ साली आलेला सिनेमा होता ‘दोस्ती’. त्या वर्षीच्या

सृष्टी निर्माता

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करण्यापूर्वी हे सर्व विश्व पाण्यात बुडालेले