Sunday, August 3, 2025

कधीकधी सूर्याभोवती खळे का दिसते?

कधीकधी सूर्याभोवती खळे का दिसते?

कथा : प्रा. देवबा पाटील


रोजच्याप्रमाणे आदित्य, सुभाष मित्रमंडळाच्या शाळेच्या मधल्या सट्टीत सूर्याच्या माहितीचे विचारविनिमय सुरू झाले.
“आपणास सूर्यप्रकाश कसा दिसतो?” चिंटूने प्रश्न केला.


सुभाष म्हणाला, “एकाच दिशेने जाणाऱ्या प्रकाशकिरणांच्या मार्गात एखादा पदार्थ आल्यावर त्या पदार्थातील कणांमुळे तो प्रकाश चोहीकडे विखुरला जातो. यालाच प्रकाशाचे विकिरण म्हणतात. आपल्या पृथ्वीवर असणाऱ्या धुळीच्या अनंत कणांमुळे त्यावरून सूर्यप्रकाशाचे विकिरण होऊन तो चोहिकडे पसरतो. म्हणून आपणास सूर्यप्रकाश स्पष्ट दिसतो.”


चिंतूने विचारले. “कारे गड्या, कधीकधी सूर्याभोवती खळे कसे काय दिसते?”


“वातावरणात धूळ, धूर, वाफ, बाष्पकण, सूक्ष्म जलकण असतात. हे आपल्या सर्वांना तर माहीतच असेल?” त्याने विचारले.


“हो ते आम्हा सर्वांना माहीत आहे.” अंतू बोलला.


“अतिशय उंचावरील थंडाव्यामुळे वातावरणातील सूक्ष्म जलकणांचे त्यांच्याप्रमाणेच सूक्ष्म बर्फाचे कण बनतात. ते स्फटिकासारखे असतात म्हणून त्यांना हिमस्फटिक म्हणतात. सूर्याभोवती जे खळे पडते ते वातावरणात खूप उंचीवर असलेल्या सूक्ष्म हिमस्फटिकांमुळे तयार होते. सूर्यप्रकाशाचे या हिमस्फटिकांवरून विकिरण झाल्यामुळे सूर्याभोवती प्रकाशाचे कडे दिसू लागते, त्यालाच खळे म्हणतात.” सुभाषने सांगितले.


“आता हे विकिरण म्हणजे काय आहे तेही सांगून टाक आम्हाला.” पिंटू बोलला.


“प्रकाशाचे विकिरण होणे म्हणजेच प्रकाश सर्व दिशांनी पसरणे, विखुरणे. उंचावरील या हिम स्फटिकांवरूनच सूर्यप्रकाशाचे परावर्तन होऊन तो चोहिकडे उधळला जातो, पसरतो त्यालाच प्रकाशाचे विकिरण किंवा विखुरणे म्हणतात. तर या हिमस्फटिकंावर सूर्यप्रकाश पडला म्हणजे त्यावरून प्रकाशाचे परावर्तन, वक्रीभवन व विकिरण होते. हिमस्फटिकावरून परावर्तित व विकरीत झालेल्या त्या प्रकाशाचेच सूर्याभोवती एक छानसे पुसटसे असे वलय तयार होते. त्यालाच सूर्याला खळे पडले असे म्हणतात.” सुभाषने स्पष्टीकरण दिले.


“मित्रा, सौरऊर्जा किंवा सौरशक्ती कशी निर्माण होते?” आदित्यने प्रश्न केला.


“उष्णता व प्रकाश हे दोन्हीही ऊर्जेची रूपं आहेत. बरोबर आहे ना मित्रांनो?” सुभाषने सर्वांना विचारले.


“बरोबर आहे, मित्रा.” आदित्यने त्याला प्रोत्साहन देत म्हटले.


सुभाष पुढे म्हणाला, “सूर्यात रासायनिक प्रक्रिया या सतत होत असल्याने त्या रासायनिक प्रक्रियांमधून सूर्यात नेहमीच प्रचंड प्रमाणात उष्णतारूपी ऊर्जा निर्माण होत असते. त्यामुळे सूर्य हा कायमस्वरूपी ऊर्जेचा स्त्रोत आहे. सूर्यापासून मिळणाऱ्या या ऊर्जेलाच आपण सौरऊर्जा किंवा सौरशक्ती असे म्हणतो. ही सौरऊर्जा मानवासाठी खूप उपयुक्त आहे. तिच्यापासून उष्णतानिर्मिती होते, रासायनिक शक्ती उत्पन्न होते, वीजही निर्माण होते. सौर विजेवर आजकाल अनेक उपकरणेसुद्धा चालतात. आपल्या नेहमीच्या मानवाने बनविलेल्या जनित्रेनिर्मित विजेचीही बचत होते नि हवेचे प्रदूषणही वाचते.”


“आता आले माझ्या लक्षात की, सूर्याला अणूभट्टी का म्हणतात ते.” आदित्य म्हणाला.


“ही अणूभट्टी काय असते रे आदित्य?” मोंटूने प्रश्न केला.


आदित्य म्हणाला, “अणुशक्ती निर्माण करण्यासाठी जी यंत्रणा उभारतात तिला अणुभट्टी म्हणतात. अणुभट्टीतून वीजनिर्मितीसुद्धा करता येते.”


“मग का म्हणतात रे, सूर्याला अणूभट्टी?” पिंटूने विचारले.


आदित्य सांगू लागला, “अणुभट्टीमध्ये प्रचंड उष्णता असते. त्यापेक्षाही कितीतरी पटीने जास्त उष्णता सूर्यात असते. म्हणून सूर्यास अणुभट्टी असेही म्हणतात.”


“पण सूर्याच्या अणुभट्टीचे इंधन कोणते आहे रे आदित्य? मध्येच चिंटूने प्रश्न केला.


“सूर्यात सतत होणा­ऱ्या रासायनिक प्रक्रियांमध्ये जेव्हा हायड्रोजनच्या चार अणूंचा संयोग होऊन एक हेलियमचा अणू तयार होतो तेव्हा सूर्याला अणुशक्ती मिळते व त्यातून उष्णता आणि प्रकाश निर्माण होतात. म्हणजे सूर्याच्या अणुभट्टीचे हायड्रोजन हेच मुख्य व महत्त्वाचे इंधन आहे. बरोबर आहे ना सुभाष?” आदित्यने सुभाषला विचारले.


“बरोब्बर आहे, दादा.” सुभाष बोलला.


इतक्यात मधली सुट्टी संपल्यामुळे पुन्हा सगळेजण आपापल्या वर्गाकडे चालू लागले.

Comments
Add Comment