Thursday, October 23, 2025
Happy Diwali

मातोश्री बंगल्यावर उद्धव - राज भेट, पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची चर्चा

मातोश्री बंगल्यावर उद्धव - राज भेट, पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची चर्चा

मुंबई : शिउबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे मातोश्री बंगल्यावर आले. अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा मातोश्री बंगल्यावर उद्धव आणि राज एका फोटोफ्रेममध्ये दिसले. या निमित्ताने पुन्हा एकदा ठाकरे बंधू युती करणार का याची चर्चा सुरू झाली आहे.

सध्या मनसेचे शून्य आमदार आणि शून्य खासदार आहेत. शिउबाठाचे मर्यादीत खासदार आणि आमदार आहेत. पण विरोधी गटात असल्यामुळे अनेक मुद्यांवर टीका टिप्पणी करणे एवढेच शिउबाठाच्या हाती आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उद्धव आणि राज यांनी केली तर विरोधी गटाची ताकद वाढेल, असे काही जणांना वाटत आहे तर दोन्ही ठाकरे बंधूंना सत्तेची सूत्र स्वतःच्या हाती हवी असल्यामुळे युती होणे कठीण आहे, असे मत अनेक राजकीय अभ्यासक व्यक्त करत आहेत.

शिउबाठा आणि मनसे या दोन्ही पक्षांची ताकद महाराष्ट्रात ठराविक भागांमध्येच आहे. यातही मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर ही अशी शहरे आहेत जिथे हे दोन्ही पक्ष एकमेकांची राजकीय जागा बळकावू इच्छित आहेत. उद्धव आणि राज या दोघांनाही आदेश देणे आवडते. यातूनच काही वर्षांपूर्वी राजकीय संघर्ष झाला होता. एकत्र आल्यास हा संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यता जास्त आहे. यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा झाली तरी निवडणुकीसाठी अशी युती होणे कठीण वाटते, असे मत अनेक अनेक राजकीय अभ्यासक व्यक्त करत आहेत.

Comments
Add Comment