Saturday, August 2, 2025

सहनशीलता

सहनशीलता

जीवनगंध : पूनम राणे


गुरुपौर्णिमेचा दिवस होता. फुलबाजार तेजीत चालला होता. नेहमी १० रुपयांला मिळणारा गुलाबाचा भाव आज चक्क वीस रुपये झाला होता.


फूल विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर आज विशेष तेज दिसत होते. कारण वर्षभरातून येणाऱ्या गुरुपौर्णिमेला फुलांच्या व्यापारातून जास्तीत जास्त कमाई होत होती. अहो, ताई, काका, दादा, सोनचाफा घ्या... गुलाब घ्या... ताजा टवटवीत मोगऱ्याचा गजरा घ्या. असे काही फूल विक्रेते जीव एकवटून आवाज देत होते.


एक आजी एका टोपलीत मोगऱ्याची फुले घेऊन बसली होती. साधारणत: वय वर्षे ७० असावं. चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या वयाची साक्ष देत होत्या. नऊवारी साडी, केसाचा अंबाडा, डोक्यावर भलं मोठं कुंकू, चेहऱ्यावरील हसरे भाव आणि आपल्या जादुई हाताने मोगऱ्यांच्या कळ्या दोऱ्याच्या साह्याने एकमेकांत गुंतवून गजरे तयार करत होती. काही मोगऱ्याच्या कळ्या आजीच्या हातून सुटका करून घेऊन खाली पडत होत्या. कारण दोऱ्यामध्ये त्यांची मान आवळली जात होती. सुटलो बुवा एकदाचं... असा सुस्कारा सोडत होत्या. आजीने दहा-पंधरा मिनिटांतच जवळजवळ वीस-पंचवीस गजरे तयार केले होते. तिचा हात जणू यंत्रासारखाच काम करत होता.


आज गुरुपौर्णिमा आणि शाळेचा वर्धापन दिवस होता. अनिता मॅडम फुले घ्यायला बाजारात आल्या होत्या. त्यांनी शाळेतील सर्वांसाठीच आजीकडून मोगऱ्याचे गजरे विकत घेतले होते. गजरे घेताना अनिता मॅडम यांनी अजिबात घासाघीस केली नाही. उलट पंचवीस रुपये त्यांनी आजीबाईला जास्तच दिले.


कारण इतक्या वयातही आजीबाईंनी घरी न बसता स्वकर्तृत्वान आपला फुलांचा व्यापार वार्धक्य विसरून जोमाने सुरू ठेवला होता. याचे अनिता मॅडम यांना फारच कौतुक वाटले होते.


शाळेत जाऊन त्यांनी सर्वप्रथम सर्वांना गजरे दिले. गुरुपौर्णिमा असल्याने आज शाळेत काहीजण उपस्थित नव्हते. मुख्याध्यापकांनी कामाचे वाटप सर्वांनाच करून दिले होते. प्रत्येकाने आपली कामे मनापासून पूर्ण केली होती.


हार आणण्यासाठी शिपाई फूल मार्केटमध्ये गेले होते. खूप वेळ झाला तरी त्यांचा पत्ता नव्हता. फोन केल्यानंतर समजले की, रस्त्यावर अपघात झाल्याने खूप ट्रॅफिक लागले आहे.


अनिता मॅडम यांनी हे ऐकताच जे शिक्षक आले नव्हते, त्यांचे उरलेले चार-पाच गजरे एकत्र करून त्याचा सुंदर हार तयार केला आणि प्रमुख पाहुण्यांनी तो मोगऱ्याच्या कळ्यांचा हार सरस्वती मातेला अर्पण केला.


अनिता मॅडम यांना खूप आनंद झाला. त्याहीपेक्षा शारदामातेला झालेला आनंद तिच्या मुखकमलावर विलसत होता. पांढऱ्याशुभ्र मोगऱ्याच्या सुगंधित, टवटवीत फुलांच्या हारामुळे माता शारदेच रूप विलोभनीय दिसत होते.


मोगऱ्याच्या कळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. खरं तर आजीबाई गजरा करत असताना आपली मान आवळली जातेय, हे त्यांच्या लक्षात येत होते; परंतु त्या सर्वच कळ्यांनी ते सहन केलं होतं. सर्वच मोगऱ्याच्या कळ्या आजी आणि अनिता मॅडम यांना धन्यवाद देत होत्या. आपल्याला आज गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर माता शारदेच्या गळ्यात राहण्याचं भाग्य लाभलं. आपल्या आयुष्याचं सार्थक झालं. याचा अत्यंत आनंद त्या कळ्यांना झाला होता. माता शारदेच्या मुखकमलावरील हास्य, वीणेचा मंजुळ झंकार ऐकत शारदेच्या गळ्यातील जणू काही ताईतच बनल्या होत्या.


तात्पर्य : हेच की कोणतीही गोष्ट आयुष्यात सहज साध्य होत नाही. मूर्ती घडवताना सुद्धा टाकीचे घाव सहन करावे लागतातच.
श्रमप्रतिष्ठा आणि सहनशीलता जीवनात अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे साहजिकच आयुष्याला जीवनगंध प्राप्त होतो.

Comments
Add Comment