Saturday, August 2, 2025

"चोल साम्राज्याचा काळ हा भारताच्या सुवर्णयुगांपैकी एक होता": पंतप्रधान नरेंद्र मोदी

चोल सम्राट राजेंद्र चोला प्रथम यांच्या जयंती विशेष कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले संबोधित 


तामिळनाडू: गंगाईकोंडा चोलापुरम मंदिर हे तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यात स्थित एक ऐतिहासिक मंदिर आहे, जे ११ व्या शतकात चोल सम्राट राजेंद्र चोला प्रथम यांनी बांधले होते. हे मंदिर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ ग्रेट लिविंग चोला मंदिरांचा भाग आहे. या मंदिरात आज राजेंद्र चोला प्रथम यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती लाभली. या दरम्यान नरेंद मोदी यांनी भारतात शेकडो वर्षापूर्वी होऊन गेलेल्या चोल सम्राज्याविषयी आणि त्यांच्या ऐतिहासिक वास्तूंविषयी आपले मत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना "चोल साम्राज्याचा काळ हा भारताच्या सुवर्ण युगांपैकी एक होता असे म्हणत भारताच्या सुवर्ण ऐतिहासिक संस्कृतीचे गुणगान गायले.



पंतप्रधान मोदी काय म्हणाले?


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगाईकोंडा चोलापुरम मंदिरात महान चोल सम्राट राजेंद्र चोला प्रथम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. या दरम्यान ते म्हणाले की 'हे मंदिर एक प्रकारे महान चोल राजाची पूजनीय भूमी आहे. इतिहासकारांचा असा विश्वास आहे की चोल साम्राज्याचा काळ हा भारताच्या सुवर्णयुगांपैकी एक होता. चोल साम्राज्याने भारताला लोकशाहीची जननी म्हणण्याची परंपरा देखील पुढे नेली. इतिहासकार लोकशाहीच्या नावाखाली ब्रिटनच्या मॅग्ना कार्टाबद्दल बोलतात. परंतु अनेक शतकांपूर्वी चोल साम्राज्यात लोकशाही पद्धतीने निवडणुका होत असत. इतर ठिकाणे जिंकल्यानंतर सोने, चांदी किंवा पशुधन आणणाऱ्या अनेक राजांबद्दल आपण ऐकतो. परंतु राजा चोलाने गंगेचे पाणी आणले.’



भगवान बृहदेश्वर मंदिरात पूजा


पंतप्रधान मोदींनी रविवारी चोलकालीन भगवान बृहदेश्वर मंदिरात पूजा केली. यावेळी ते वैदिक आणि शैव तिरुमुराई जप तसेच प्रार्थना करताना दिसले. गंगेच्या पवित्र पाण्याने भरलेला कलश त्यांनी यावेळी अभिषेकासाठी आणला होता. हिंदू परंपरेनुसार वेष्टी (धोतर), पांढरा शर्ट आणि गळ्यात अंगवस्त्र परिधान करून त्यांनी मंदिराच्या आतील भागात प्रदक्षिणा घातली. पंतप्रधान मोदींनी चोल शैव धर्म आणि स्थापत्यशास्त्रावरील भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या प्रदर्शनालाही यादरम्यान भेट दिली.



गंगाईकोंडा मंदिराचा इतिहास


गंगाईकोंडा चोलापुरम मंदिर हे तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यात स्थित एक ऐतिहासिक मंदिर आहे, जे ११ व्या शतकात चोल सम्राट राजेंद्र चोला प्रथम यांनी बांधले होते. हे मंदिर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ ग्रेट लिविंग चोला मंदिरांचा भाग आहे, ज्यामध्ये तंजावरचे बृहदेश्वर मंदिर आणि दारासुरमचे ऐरावतेश्वर मंदिर देखील समाविष्ट आहे. हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे. त्याचे नाव गंगाईकोंडा चोलापुरम (गंगा जिंकणारा चोला) राजेंद्र चोलाच्या गंगा नदीवरील लष्करी विजयाचे स्मरण करते.


गंगाईकोंडा चोलापुरम मंदिराचे मुख्य गर्भगृह ५५ मीटर उंच आहे. येथे १३.५ फूट उंच शिवलिंग आहे, जे दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एक आहे. मंदिराची रचना द्रविड शैलीची आहे, ज्यामध्ये गुंतागुंतीचे कोरीवकाम आणि शिल्पे आहेत, जी चोल कला आणि स्थापत्यकलेची उत्कृष्टता दर्शवते. हे मंदिर २५० वर्षे चोल साम्राज्याची राजधानी म्हणून काम करत होते आणि त्याचे बांधकाम इ.स. १०३५ मध्ये पूर्ण झाले. मंदिर संकुलात नंदी मंडप, अलंकार मंडप आणि महा मंडप असे अनेक मंडप आहेत. येथे दररोज चार पूजा होतात आणि महाशिवरात्रीसारखे वार्षिक उत्सव आयोजित केले जातात. मंदिर पर्यटकांसाठी सकाळी ५ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री ९ पर्यंत खुले असते.

Comments
Add Comment