
मुंबई: 'झी' वाहिनी प्रेक्षकांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांना पुन्हा एकदा मनोरंजनाच्या प्रवासात घेऊन जाण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रेक्षकांची लाडकी आणि लोकप्रिय खाद्यसंस्कृतीवर आधारित मालिका 'आम्ही सारे खवय्ये' लवकरच एका नव्या पर्वातून परत येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या लोकप्रिय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महाराष्ट्राचा लाडका अभिनेता संकर्षण कऱ्हाडे करणार आहे.
'झी मराठी' वाहिनीवरील सध्या गाजत असलेल्या 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेच्या एका खास भागात खुद्द संकर्षण कऱ्हाडेने हजेरी लावली होती. याच वेळी त्याने 'आम्ही सारे खवय्ये'च्या पुनरागमनाचं 'गुपित' उघड केलं. मालिकेत संकर्षण तिलोत्तमासोबत गप्पा मारत असताना तो म्हणाला, "तू ऐकलंस का? 'आम्ही सारे खवय्ये' परत येतंय!" त्याच्या या एका वाक्याने प्रेक्षकांना सुखद धक्का बसला.
View this post on Instagram
हा व्हिडिओ लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चर्चांना उधाण आलं.
या घोषणेमुळे 'झी मराठी' वाहिनीने टीआरपीच्या शर्यतीत पुन्हा नंबर वन येण्यासाठी जोरदार कंबर कसल्याचं दिसून येतंय. एकामागोमाग एक नव्या मालिकांची घोषणा करत वाहिनी प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.
कधी आणि कुठे पाहता येणार?
'आम्ही सारे खवय्ये'च्या या नव्या पर्वाची नेमकी तारीख आणि वेळ अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र लवकरच 'झी मराठी' वाहिनीवर हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. संकर्षण कऱ्हाडेच्या सूत्रसंचालनामुळे या पर्वाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.