“तेरी तस्वीरको सीनेसे लगा रखा हैं!”

  36

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे

‘राजश्री प्रॉडक्शन्स’चा जन्म १९४७सालचा. ताराचंद बडजात्या यांनी ही कंपनी स्थापन केली. त्यांचा पहिला सिनेमा होता ‘आरती’! प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांनी ‘आरती’ची चांगली दखल घेतली. तो अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही दाखवला गेला.

त्यानंतर १९६४ला आलेला ‘दोस्ती’ खूप चालला. दोस्तीची गाणी आजही अनेक जुन्या रसिकांच्या ओठावर आहेत. त्याला सर्वोत्तम हिंदी चित्रपटाचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले होते. त्याशिवाय दोस्तीने तब्बल ६ फिल्मफेयर पारितोषिकेही पटकावली.

सिनेमानिर्मिती करताना बडजात्यांनी आपली म्हणून काही वैशिष्ट्ये नेहमी कटाक्षाने जोपासली- संपूर्ण कुटुंबाने सोबत बसून पाहाव्यात अशाच कथा निवडणे, प्रत्येक सिनेमातून काहीतरी चांगला, सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करणे पण तेसुद्धा रंजकता सांभाळून, संयत अभिनय आणि हिंसेला कधीही उत्तेजन न देणे, यामुळे राजश्रीचे बहुतेक सिनेमा लोकप्रिय होत.

अलीकडे जाणीवपूर्वक प्रचंड हिंसाचार आणि अनिर्बंध अश्लील दृश्ये दाखवणाऱ्या गुन्हेपटाना प्रेक्षकही उचलून धरत आहेत. अशा सवंग लोकप्रियतेसाठी काहीही करणाऱ्या सिनेमांना जेवढे यश मिळते तेवढे जरी मिळाले नाही तरी अभिरुचीसंपन्न प्रेक्षकात राजश्रीचे स्थान आजही एक विश्वासार्ह, प्रतिष्ठित निर्माते म्हणून कायम आहे.

‘चितचोर’, ‘उपकार’, ‘गीत गाता चल’, ‘अखियोंके झरोकोसे’, ‘सारांश’, ‘दुल्हन वही जो पिया मन भाये’, ‘मैने प्यार किया’ हे सर्व सिनेमा राजश्रीचे होते. ‘मैने प्यार किया’ने तर राजश्रीला पुन्हा ६ फिल्मफेयर पारितोषिके मिळवून दिली. तो सलमान खानचा पहिला चित्रपट होता. त्यानंतरच्या ‘हम आपके हैं कौन’ने सर्वोत्तम हिंदी फिल्मचे राष्ट्रीय पारितोषिक आणि पुन्हा ८ फिल्मफेयर्स पटकावली! त्याशिवाय ‘हम आपके हैं कौन’ला ‘स्क्रीन’चीही ६ पारितोषिके’ मिळाली!

राजश्रीने टेलिव्हिजनमध्येही १९८५ पासूनच पदार्पण केले आहे. बडजात्यांनी टीव्हीच्या प्रेक्षकांनाही अनेक लोकप्रिय मालिका दिल्या. सध्याही ‘कलर्स’ वाहिनीवर त्यांची ‘मनपसंदकी शादी’ ही मालिका सुरू आहे.

राजश्रीने १९७९ला अरुण गोविल आणि झरिना वहाबला घेऊन, तारुण्यात नव्यानेच प्रवेश करणाऱ्या प्रेमी जोडीचा एक रोमँटिक सिनेमा काढला. त्या संगीतप्रधान सिनेमाचे नाव होते ‘सावनको आने दो’. यात अमरीश पुरी, रिटा भादुरी, जानकीदास, रुपेशकुमार, लीला मिश्रा, मुक्री असे इतर कलाकार होते. सिनेमाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यात विविध ८ गीतकारांनी लिहिलेली तब्बल

१० गाणी होती आणि फक्त गाण्यांनीच सिनेमाचा ४० मिनिटांपेक्षा जास्त वेळ व्यापलेला होता. सिनेमाचे बहुमतांश चित्रण लखनऊ शहरात आणि त्या शहराच्या आसपासच्या परिसरातच झाले.

अत्यंत गरीब कुटुंबातून आलेल्या बिरजूला (अरुण गोविल) श्रीमंत चंद्रमुखीने (झारिना वहाब) गायक म्हणून प्रसिद्ध होण्यासाठी आणि सगळे वैभव प्राप्त करण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहन आणि सर्व प्रकारची खूप मदत केलेली असते. त्यातून त्यांच्यात प्रेमाचे अंकुर फुलतात; परंतु वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांची प्रेमकथा अपुरी राहिलेली आहे. बिरजू मुंबईत जाऊन एक प्रसिद्ध आणि श्रीमंत कलाकार बनलेला आहे. आता त्याला लोक पंडित ब्रिजमोहन म्हणून ओळखतात.

एकदा गावातील शाळा आर्थिक अडचणीत आल्याने काही शिक्षकांना नोकरीवरून कमी करणार असते. शाळेच्या मदतीसाठी एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन तिकीट लावून करण्याचे ठरते. त्यासाठी मुंबईतील प्रसिद्ध कलाकार म्हणून पंडित ब्रिजमोहनना आमंत्रित केले जाते.

प्रेक्षकात बसलेल्या चंद्रमुखीला पाहून बिरजू आपल्या मनात खोल रूजलेले तिचे प्रेम व्यक्त करताना जे गाणे म्हणतो ते कर्णमधुर गाणे उतरले होते ‘फौक जामी’ यांच्या लेखणीतून! जामी यांच्या रोमँटिक, भावनिक ओळींना राजकमल यांनी दिलेले संगीत लोकांना फार भावले आणि कदाचित त्यामुळे गाणे युवा प्रेमिकात अतिशय लोकप्रिय झाले. येसुदास यांनी समरस होऊन गायलेल्या त्या गाण्याचे काहीसे निराश पण खूप रोमँटिक शब्द होते - ‘तेरी तस्वीरको सीनेसे लगा रखा है, हमने दुनियासे अलग गाँव बसा रखा है..’

प्रेमाच्या पहिल्या बहरात असेच तर होत असते! यौवनात प्रवेश केलेला प्रामाणिक नायक आणि हळवी नायिका परस्परांच्या प्रेमात पूर्ण बुडालेले असतात. वर सिनेमाचे नावही होते ‘सावन को आने दो’ मग काय प्रेमाची नुसती बरसात! बिरजू म्हणतो, ‘तूच तर माझ्या भविष्याच्या रेषांना उजळ केलेस. माझ्यासारख्या नगण्य माणसाला एक मोठा कलाकार बनवलेस. चंद्रमुखी, आजही तू बोललेला प्रत्येक शब्द माझ्या मनात साठवलेला आहे.’ माझ्या मनाच्या गाभाऱ्यात मी तुझी प्रतिमा कायमची स्थापलेली आहे. मेरी किस्मतकी लकीरोंको सजाया तूने... एक नाचीजको फनकार बनाया तूने... मैंने हर बोल तेरा दिलमें बसा रखा है... हमने दुनियासे अलग गाँव बसा रखा है...

प्रिये, मनातल्या मनात तर मी रात्रंदिवस तुझ्या मूर्तीची पूजाच केली. जिथे तुझी पावले उमटली तिथे थांबून मी तुझ्या प्रेमाला नमन करत आलो. आजही बघ, माझे शीर तुझ्या पूजनात झुकलेलेच आहे! मी जरी हे गाव सोडून गेलो असलो आणि आपली कायमची ताटातूट झालेली असली तरी मी मनात आपल्या दोघांचे एक वेगळेच गाव वसवले आहे- ‘तुझको दिन रात खयालो में है पूजा मैंने... तेरे पैरों के निशांपर किया सजदा मैंने... बंदगीमें तेरी सर अब भी झुका रखा है... हमने दुनियासे अलग गाँव बसा रखा है...’

कवी म्हणतो, ‘मला प्रत्येक गाण्यात तुझी प्रतिमा दिसते. मी जेंव्हा जेंव्हा गात असतो तेंव्हा तुझ्यापासून कितीही दूर असलो तरी मी तुलाच साद घालत असतो. तू मात्र मला अजूनही का परके करून ठेवले आहेस?’ ‘मैंने गीतोंसे छवि तेरी बनाई बरसों... दूर रहकर तुझे आवाज लगाईं बरसों... किस लिए तूने मुझे गैर बना रखा है... हमने दुनियासे अलग गाँव बसा रखा है...’

प्रत्येक प्रेमकथेत हे असेच होत नसते का? मनात सतत प्रियेची किंवा प्रियकराची प्रतिमा तरळत राहणे, जिथे फक्त दोघेच आनंदाने राहतात असे एक काल्पनिक गाव मनात कायमचे वसवले जाणे, आयुष्याचे मार्ग कायमचे वेगळे झाले तरी आठवणींच्या लाटा मनाच्या समुद्रात उसळत राहणे नेहमी सगळे सारखेच! फक्त कुणी व्यक्त करते तर कुणी त्या निर्जन, उदास गावातच राहून आयुष्य काढते, इतकेच!

Comments
Add Comment

शहाणपण

जीवनगंध : पूनम राणे दिनेश शाळेतून घरी आल्यापासूनच खूपच नाराज दिसत होता. आई त्याला खोदून खोदून विचारण्याचा

पसायदान

काळोखाच्या गावी, प्रकाशाच्या वाटा : श्रद्धा बेलसरे खारकर आळंदीच्या ‘पसायदान गुरुकुला’तून बाहेर पडताना खूप

सृष्टीची निर्मिती

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे ह्मदेवाने आपल्या विविध अंगापासून ऋषींची (मानसपुत्रांची) उत्पत्ती केली.

प्रथा...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर लंडनमध्ये घडलेली एक घटना... मार्गारेट थेंचरबाई पंतप्रधान असताना त्यांनी देशाच्या

‘वो भारत देश है मेरा...’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे ए न. सी. फिल्म्सचा केदार कपूर दिग्दर्शित ‘सिकंदर-ए-आझम’ हा सिनेमा १९६५ साली आला.

पालकत्व आणि वैवाहिक आयुष्यातील समतोल

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू नवीन पालक होणे हा आनंद, प्रेम आणि नवीन अनुभवांनी भरलेला एक रोमांचक प्रवास असतो. हा