Sunday, August 24, 2025

श्रावणधून

श्रावणधून

माेरपीस : पूजा काळे 

तूहवासं, तरीही नकोसा असलेल्या या नात्यामध्ये चिंब भिजताना, मन रमवताना लाडे लाडे करत तुला पुकारल जातं, यातचं तुझ्या साम्राज्याची कल्पना येते. ढगावर स्वार होत, धरतीला कवेत घ्यायला निघालेली तुझी स्वारी विलक्षण आक्रमक तिरंदाजीचे निशाण फडकवते. निलांबरी काळ्याकुट्ट ढगाआड लपलेल्या पारसमणी श्वेत पदरातून, मोतीरूपी थेंबाची विसर्जित होण्याची किमया अचंबित करणारी. ऋतू पालटताचं परकाया प्रवेश करावा तशा दुधाळलेल्या सहस्र धारा महादेवाच्या पिंडीवर बरसण्यास आतुरलेल्या. दुर्वाप्रिय गणेशास हरित तणांच्या मखमली पखाली प्रदान करण्यास वेगाच्याही पलीकडे जाऊन वेग घेतलेल्या जिव्हाळ्याच्या पावसाचा शिंपीत येणारा तुझा फेसाळ सडा. अंगावर रोमांच उभा करण्यात तुझा हात कुणीचं धरू शकत नाही. तुझ्या आगमनाने पालटलेला सृष्टीचा चेहरामोहरा स्वर्गीय अप्सरांपेक्षा अधिक लोभस, सालस वाटू लागतो. अहाहाऽऽऽ काय वर्णावी तुझ्या सौंदर्याची नजाकता. चराचरांत कोपऱ्या न् कोपऱ्यात तुझ्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा छन्न करत खळखळतात. तू तुझ्याचं मस्तीत भारलेला. ऋतूमिलनाच्या वेळी आभाळाला पान्हा फुटण्याचा काळ समीप येता, आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या मानवी मनाची वेदना जाणून अवतीर्ण होतोस तू. विद्युलतेच्या सहस्र धारा चपळाईने पडतात. डबडबलेल्या थेंबातून अवनीवर अाविष्कार घडतो. विधात्याचे गोड स्वप्न बहरू लागते. पहिल्या प्रहरापासूनचं उन्मादाने भारल्यासारखा आषाढ कोसळू लागतो.

सरीवर सरी पावसाच्या सरी, ढगाच्या पाठीवर घनाची सवारी... ढगामंदी दवापरी आभाळाची छाया, वर्षावात चिंब होई शिणलेली काया... अंगणाशी सोयरीक सुगंधित फाया, अमृताच्या थेंबावरी जडली हो माया... पावसाने पावसाला काही सांगायचे, ओलाव्याच्या जाणिवांनी पुन्हा रुजायचे... शर्यतीच्या वाऱ्यापुढे आभाळाचा कावा, कुठं कुठं बरसावा ओला शिडकावा... मनोमनी हलकेचं आठवून पाहावा, चातुर्मास खुणावत श्रावण यावा... पहिल्या पावसाच्या पहिल्या धारेत ज्येष्ठ आषाढ न्हाऊन निघतो. येई तुझ्या स्वागताला मृग नक्षत्र धावून नेम चुकीवत येशी जाती अंदाज पळून तुज सांगते पावसा पड डोंगर कुशीत गाठ धरणाचा तळ बांध शिवाराशी प्रित सळाळत्या विजेतून पारा सोडतात धारा वेगे चित्कार घुमतो रौद्ररूपी मत्त वारा छत्र हरपल्या राती मिट्ट काळोख उरात वर भयाण तांडव चाले भरल्या मेघात काळ कठीण समय किती झेलतो प्रहार पावसाला नाही थारा झोडपून देई मार...

थारा नसलेल्या पावसाचा सूर ताल एक होतो. निसर्गाशी रममाण होताना आतल्या आत अंकुर फुलू लागतो. या अंकुराला कधी विरहाचं, कधी जाणिवांचं, कधी प्रेमाचं तर कधी धूसर आठवणींच अस्तर लपेटलेलं असतं. थेंबाच्या परिस स्पर्शाने ओलेत्या आठवणी आकर्षित होऊन पाकळीसमान खुलतात. सभोवार नजर टाकावी तर हिरव्या शाईने तुडुंब भरलेले रानमळे पाखरांना खुणावू लागतात. स्वप्न सत्यात येण्याच्या काळातली ही रम्य पावसाळी दुनिया अचंबित करणारी. हिरव्याकंच दऱ्यातली तांबडमाती निळ्याशार जीवनाचं सार शिकवते. पाट-पाण्याचा ओघ वाढत जातो. प्रवाही जीवन दुथडी भरून वाहताना शिवारात नाद घुमू लागतो. मातीच्या गुजगोष्टी मातीत मिसळू पाहतात. सोनकेशरी उन्हं लेवून सजलेला पाचू कवडश्याचा डोंगरमाथा उजळू लागतो. कीटकांना, भवऱ्याला संमोहित करणाऱ्या कौमुदी आपला गंध सोडतात आसपास. केवड्याच्या रानातला घमघमाट थेट दारात रेंगाळतो. मुक्त पारिजात सुहास्य सांडत जमिनीशी नाते जोडतो. सोनटक्का झळाळतो. वातावरणाला धुंद करणारा मोगरा देवस्थानी पोहोचतो. कोकिळ गुंजन, पक्ष्यांच्या किलबिलाटाने आसमंताला जाग येते. पिकं डौलाने डोलू लागतात. तरूलता बांदावरची पकड घट्ट करते. वेली जोम धरू लागतात. आषाढघन श्रावण सर करू लागतो, तेव्हा कुंद आठवणी अलवार वर येऊ पाहतात. एखाद्या कलाकुसरीत रंग भरावेत अशा पद्धतीने पसरू लागतात. अशावेळी आठवांच्या पावसात भिजण्याचा आनंद वेगळा असतो. हृदय कोरडं पाषाण असलं तरी, डोळ्यांत अथांग पूर दाटतो. मनात वादळ उठतं. माझ्या नभांगणातले ढग, पावसाच्या संघर्षात इंद्रधनुष्य फुलू लागतं. तुझ्या रंगात रंगू लागतं. ऊन-सरींचा लपंडाव खेळत, श्रावण दारात रूंजी घालतो. मुहूर्ताची वाट पाहत सण, व्रत, वैकल्य हातात हात घालून तयार होतात. श्रावणावर बेतलेल्या गाण्यांचे पडघम दूरवरून ऐकू येतात.

‘‘पैंजणाचा नाद आला गोड कानी गं... उंबरठ्यावर पाऊल उठले कोण आली गं” म्हणत पैंजण वाजू लागतात. “श्रावणात घननिळा बरसला.” “श्रावण आला गं सखे श्रावण आला.” “केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर.” चंदेरी सरीत सोनकेशरी उन्हात कोसळणारा तुझ्या आठवांचा पाऊस क्षणात पसार होतो. त्यात तुझ्या प्रीतीचा सुगंध भिजलेल्या मातीच्या सुगंधाप्रमाणे दरवळतो. चित्त विचलित होतं. सावळ्याची बासरी वाजू लागते. डोळ्यांच्या कालव्यात श्रीहरी उतरू लागतो. मनभावन श्रावण नाचू लागतो. आभाळाचा ऋतू म्हणून गणला गेलेला, सणांची पुंजी असलेला, निसर्गाचं वाण जपत आलेला श्रावण तुझा माझा होऊन श्रावणधून होत आनंद देत जातो.

Comments
Add Comment