डॉ. प्रशांत सिनकर (पर्यावरण अभ्यासक)
शहरीकरणामुळे आणि मानवाच्या अतिक्रमणामुळे सापांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मुंबईसारख्या शहरात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अन्न व निवाऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावू लागली आहे. माणसाच्या निवाऱ्याचा प्रश्न उद्भवू लागल्यामुळे जंगले तोडून काँक्रिटीकरण, मोठमोठ्या इमारती प्राण्यांच्या वस्तीत प्रगत माणूस उभारू लागला आहे. आजकाल आपण नेहमी ऐकतो की वन्यप्राणी मानवी वस्तीमध्ये शिरले आहेत. यामुळे मनुष्य आणि वन्यजीव यांच्यात संघर्ष निर्माण होतो. या संघर्षात दोघांनाही इजा होते. या समस्येवर तोडगा काढणे खूप गरजेचे आहे.
कधीकाळी नागपंचमीचा दिवस म्हणजे घरासमोर, मंदिराच्या पायऱ्यांवर, एखाद्या झाडाच्या सावलीखाली किंवा रस्त्याच्या कडेला सापाचे दर्शन व्हायचे. तेव्हा ‘भीती’ वाटत नव्हती, होती ती फक्त ‘श्रद्धा’.
नागपंचमीचा सण आला की,
आई ओव्या म्हणायची,
“नाग देवता, राखा मजसी,
दूध-बत्ताशा अर्पिते हंसी...”
पण आता? नागपंचमी आली की बाजारात प्लास्टिकचे नाग, मोबाइलवर GIF सर्प आणि फेसबुक स्टोरीज दिसतात. मात्र साप काही दिसत नाहीत. दुपारच्या वेळी शाळेतून घरी येताना पायवाटांवर सावली देणारी चिंच, वड, पिंपळांची झाडं असायची. कधीकधी शाळेत ये-जा करताना साप दिसायचे. तेव्हा थोडी भीती वाटायची, पण ती भीती ‘दुरावा’ निर्माण करायची नाही. उलट एक कौतुकाचं, निसर्गाशी जवळीक जपणारं नातं तयार व्हायचं. नागपंचमी आली की आई भिंतीवर नागोबाची रांगोळी काढायची. तांदळाच्या पिठाच्या ठिपक्यांची बोटे उमटवून नागाची आकृतीची रांगोळी पूर्ण व्हायची. मुलं मातीचे नाग घडवायची. कुणाच्या तरी कुंपणात खराखुरा नाग डोकं वर काढून उभा असायचा आणि त्याच्यावर हळद-कुंकू वाहिलं जायचं. तो एक सण नव्हता, तो एक सजीव अनुभव होता.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झपाट्याने शहरीकरण होत आहे. जी गावं कधी काळी हिरवाईने नटलेली होती, ती आता रस्ते, टाइल्स, इमारती, गाड्यांनी भरू लागली आहेत. याच गावांमध्ये आधी सापांना निवारा मिळायचा. झाडं, ओलसर माती, ओढे, पाणवठे. हे सगळं गिळंकृत झालं आणि ज्यांना या गोष्टींची गरज होती ते सर्पही हरवू लागले. पूर्वी शेतशिवारात, वस्तीच्या कडेला सहज नाग, धामण, मण्यार, कवड्या, घोणस दिसायचे. पण आता तिथे भली मोठी गृहनिर्माण प्रकल्प, काँक्रीटचे रस्ते आणि भूमिगत केबल्स दिसतात. सर्पांचे घरच नाहीसे झाले आहे.
साप म्हणजे नुसता ‘पूजनीय प्राणी’ नव्हे, तर तो एक अत्यंत महत्त्वाचा परिसंस्था संतुलक आहे. साप उंदीर, बेडूक, सरडे, कीटक खातो – त्यामुळे शेतीचं नुकसान टळतं, रोगराई आटोक्यात राहते. आज जर साप नसतील, तर उद्या उंदीर शेतं पोखरतील. म्हणून सापांची उपस्थिती ही शत्रू नव्हे, मित्र म्हणूनच बघायला हवी होती. मात्र आपण काय केलं? त्यांची घरं उद्ध्वस्त केली आहेत. नागपंचमीच्या सणाला आपण बाजारातून नागाच्या मूर्ती खरेदी करून त्याची पूजा करतो. एकेकाळी नागपंचमी म्हणजे निसर्गाशी, सर्पांशी थेट भेट होणारा दिवस होता. महिला वारुळाच्या ठिकाणी जाऊन वारुळ, नागाची पूजा करायच्या. आज तो एक ‘पोस्ट अपलोड’ करण्याचा दिवस झाला आहे. नागपंचमीची मूळ भावना हरवली असून उरली ती केवळ कृत्रिमता. एवढंच नाही तर अनेकदा नागपंचमीसाठी खरे साप ‘पकडून’ आणले जातात, पिंजऱ्यांमध्ये ठेवले जातात. त्यांना दारू, दूध पाजून त्यांच्या जीवाशी खेळलं जातं. ‘साप’ दिसला की त्याला मारून टाकण्याचे प्रकार वाढत आहेत. फक्त सर्पांची पूजा नको, त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करायला हवं. प्रत्येक शहरात हरित पट्ट्यांची संख्या वाढवली पाहिजे. शाळा-महाविद्यालयांत ‘सर्पसाक्षरता अभियान’ राबवले पाहिजे. सर्पमित्र संघटनांना मदत करणे, नागपंचमीच्या निमित्ताने पर्यावरण दिन पाळणे, सोशल मीडियावर फोटो टाकण्याऐवजी - झाड लावा, झुडप जपा असा अट्टहास, प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. आपण त्यांचे अस्तित्व उद्ध्वस्त न करता, त्यांच्या अन्नसाखळीवर घाला न घालता वाढते शहरीकरण, जंगलतोड कशी रोखता येईल याचा विचार केला पाहिजे.
सर्पांची घटती संख्या – एक पर्यावरणीय अलार्म
पूर्वी पावसाळ्याच्या दिवसात एक सर्प मित्र सुमारे १५० ते २०० साप पकडून सुरक्षित ठिकाणी सोडत होते. मात्र आता परिस्थित उलटी आहे. जिथे खऱ्या जंगलाची जागा सिमेंट क्राँक्रीटच्या जंगलांनी व्यापली आहे, अशा ठिकाणी वर्षभरात नाग दिसणंही कठीण झालंय. शहराच्या विस्तारात “साप कुठे राहणार?” हा प्रश्नच कुणी विचारत नाही. शहरात उरलेल्या गवताळ जागा, ओढे, डबकी यांवरही अतिक्रमणं. त्यामुळे सापांच्या अन्नसाखळीचाही बळी जातोय. सर्प नष्ट झाले, म्हणजे निसर्गाचा एक महत्त्वाचा भाग गमावला.
- चष्मेधारी नाग (Spectacled Cobra)
प्रदेश : संपूर्ण भारतभर, विशेषतः महाराष्ट्र, ठाणे, मुंबई.
वैशिष्ट्य : डोक्यावर ‘चष्म्यासारखा’ फणा असतो.
खाद्य : उंदीर, बेडूक, सरडे.
विशेष गोष्ट : माणसाच्या परिसरात सहज आढळतो. पण शहरीकरणामुळे आता हे दर्शनही दुर्मीळ होतंय. लोकांच्या अज्ञानामुळे अनेक वेळा बिनबोभाट मृत्यू पत्करतो. - मोनोक्लेड कोब्रा (Bengal Cobra)
प्रदेश : बंगाल, आसाम, उत्तर-पूर्व भारत.
वैशिष्ट्य : शरीरावर पिवळसर आडवे पट्टे,
सुमारे सात फूट लांब.
खाद्य : मासे, उंदीर, बेडूक.
विशेष गोष्ट : या नागाच्या लाळेतही विष असतं.
संकटसमयी शत्रूकडे ती फेकतो. - ब्लॅक कोब्रा (Black Cobra / Central
Asian Cobra)
प्रदेश : गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, जम्मू.
वैशिष्ट्य : काळसर रंग, अत्यंत घातक
खाद्य : उंदीर, सरडे, छोटे प्राणी.
विशेष गोष्ट : भारतात आढळणाऱ्या कोब्रांमध्ये सर्वाधिक
विषारी मानला जातो. याचा दंश हलकाही असला, तरी
मृत्यूलाही आमंत्रण ठरू शकतो. - अंदमान कोब्रा (King Cobra – नागराज)
प्रदेश : गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू,
अंदमान, ईशान्य भारत.
वैशिष्ट्य : १२ ते १८ फूट लांबीचा, नागासारखा दिसतो पण ‘नाग’ नसतो.
विशेष गोष्ट : विषारी सापांमध्ये सर्वात लांब. याचा फणा
असतो पण तो ‘नागकुळातला’ नसतो. हा ‘सापांचा भक्षक’ म्हणूनही ओळखला जातो.
महाराष्ट्रात दिसणारे सर्वसाधारण साप
- बिन विषारी : धामण, दिवड, नानेटी, गवत्या, डूरक्या घोणस, रुकई, कवड्या, धुळ नागीण, कुकरी अजगर
- निम विषारी : हरणटोळ, मांजऱ्या
- विषारी : नाग, घोणस, मण्यार, फुरसे