मायभाषा : डॉ. वीणा सानेकर
व्यक्तिचित्रे हा मराठी साहित्यातील साहित्यप्रकार पु. ल. देशपांडे यांनी उभ्या केलेल्या व्यक्ती आणि वल्ली, व्यंकटेश माडगूळकर यांची माणदेशी माणसे ही तर सहज डोळ्यांसमोर येणारी पुस्तके. माणसे वाचता येणे ही तर कला आहेच पण ती माणसे उभी करणे, चितारणे ही देखील महत्त्वाची कला आहे. महनीय माणसांची व्यक्तिचित्रे रेखाटता येतात तशी अत्यंत साधी सामान्य माणसेही उभी करता येतात. उदाहरणच घ्यायचे झाले तर पुलंची, लता मंगेशकर, ज्योत्स्ना भोळे ही व्यक्तिचित्रे मनात कोरली गेली आहेत, तसाच लग्नमंडपात राबणाऱ्या आणि लग्नमंडप सुनासुना झाल्यावर मंडपातच मुटकुळी करून पडून राहणारा नारायणही अविस्मरणीय आहे. माडगूळकरांनी चितारलेली माणदेशी माणसे त्यांच्या लकबींसह, भाषेसह सजीव झाली आहेत.
प्रकाश संत यांनी लंपन या कुमारवयीन मुलाच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध कंगोऱ्यांसह सुंदर शैलीत व्यक्तिरेखा रेखाटली आहे. केवळ वर्णनापलीकडे जाऊन विशिष्ट व्यक्तीच्या
मनाचा वेध घेणे हे खरे कौशल्य असते.
अलीकडेच विद्या प्रभू यांची काही व्यक्तिचित्रे हाती आली. कोकणातली सरळसाधी माणसे त्यांनी छोट्या-छोट्या बारकाव्यांसह साकारली आहेत.
‘भगलखोर भिवा, मनात्ते, लुकतुके गुरुजी, चाकरमानी बाबी यांची ही व्यक्तिचित्रे लेखिकेचे शब्द बोलके करतात.
“आजकाल निराशेचे सूर अनेकदा ऐकू येतात आणि आपण उदास होतो. मात्र त्याचवेळी काही चांगली माणसंही आपल्या आसपास वावरताना आढळतात. आपल्या वागणुकीने ती लोकांना आश्वस्त करतात. त्यांच्या माणूसपणामुळेच या जगाचा तोल ढळलेला नाही, ते तरलं आहे असेही वाटत राहते.”
कोकणातले मुडी, कणगी तट्टे, कौलं, खळं, मेढ, गजाल, बाप्या, भानशेरी पै-पावणे, हडपो, माका, परसात असे कोकणातल्या मालवणी बोलीतले अनेक शब्द या व्यक्तिचित्रांतून सहज गवसतात. बालविधवा असलेली विद्या प्रभू यांची आजी म्हणते, “दुःख कोणाक चुकला हा? रामाची सीता, पांडवांची द्रौपद, हरिश्चंद्राची तारामती, सगळ्यो मोठ्या पतिव्रता. त्यांची पुण्याई केवढी त्यो राजाच्यो राणी, त्येनी किती दुःख सोसल्यांनी मी कोण्या झाडाचो पालो!”
दुःखामुळेच जीवनाचा अर्थ उमगलेली आजी मनाला हळुवार स्पर्श करून जाते. त्यांनी रंगवलेला भिवा म्हणतो, “माणसाक काय देवचा, बोलूचा, खावक घालूचा असता, ता तेच्या जिवंतपणी. माणूस मेल्यावर असली सोंगा करून तेचो काय उपयोग? जिवंतपणी म्हाताऱ्या माणसाक कोण विचारीत नाय, मगे तेराव्याक तेचो फोटो पूजतत, तेका मोठो हार घालतत, जेवणावळी वाढतत!”
विद्या प्रभू ही व्यक्तिचित्रे समजून घेताना जाणवते की या माणसांची आयुष्याकडे पाहण्याची स्वतंत्र दृष्टी आहे. जीवनाविषयी ही माणसे ठामपणे चिंतन करतात. आनंदाचे मळे फुलवण्याची
ओढ असणारी साधी भोळी माणसे आपले जगणे समृद्ध करतात.