कधी धो धो कोसळतो
कधी रिमझिम बरसतो
आई, सांग हा पाऊस
असा का बरं वागतो?
धुवांधार कोसळे तेव्हा
अंधार भोवती दाटतो
पाणी होते चहूकडे
जीव घाबरून जातो
मुसळधार पावसात
शेतं जातात वाहून
माझ्या शाळेचाही रस्ता
जातो पाण्यात बुडून
रिमझिम बरसतो तेव्हा
झाडं खुशीत डोलती
माझ्या होड्याही पाण्यात
कशा डौलाने चालती
अशा ओल्या दिवसांत
झरे गालात हसती
डोंगर हिरवे होऊन
मोठ्या थाटात बसती
आई, बघ हा पाऊस
कसा खट्याळ वागतो
छत्री असते सोबत
तेव्हा लपून बसतो
आई म्हणते बाळा
पाऊस जरी हा लहरी
त्याच्यामुळे पीकपाणी
सुख येई घरोघरी